Last Updated on 20 May 2025 1:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६ व्या वर्षी जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या (आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र) उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या वैज्ञानिक योगदानाबरोबरच, ते आपल्या रसाळ आणि समजेल अशा भाषेतील मराठी विज्ञानकथांसाठीही ओळखले जात होते.
डॉ. जयंत नारळीकरांचा परीचय
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.
विविध पुरस्कारांचे मानकरी
डॉ. जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रँव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ आणि पद्मविभूषण’ हा सर्वोच्च सन्मान देखील मिळाला. परंतु, केवळ संशोधन क्षेत्रात कार्यरत न राहाता त्यांनी लेखनाच्या माध्यमातून विज्ञानवादाचा प्रसार केला ‘अंतराळातील भस्मासूर’,अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप ही त्यांची काही गाजलेली विज्ञानवादी पुस्तके. ‘चार नगरांतले माझे विश्व”या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार तसेच अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार आणि फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार आदी विविध महत्वपूर्ण पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्यसंपदा
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
डॉ. नारळीकर यांची विज्ञानविषयक पुस्तके
अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)
मुंबई | भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. नारळीकर यांच्या कन्या श्रीमती गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना सांत्वना दिली.
डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाना दिले.
दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, ‘भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमुल्य योगदान दिले. गणितीज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (IUCAA)’ “आयुका” या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ ला पर्यायी संकल्पनाही त्यांनी मांडली. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले.
सर्वात महत्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचार-प्रसारातील डॉ. नारळीकर यांचे कार्य देखील असेच भरीव राहिले. त्यांनी विज्ञान लेखक म्हणून केलेली कामगिरी साहित्यिक दृष्ट्या अजरामर अशीच राहील. कारण त्यांनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत केलेल्या लेखनामुळे नव्या पिढीत, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढीस लागली. ‘आकाशाशी जडले नाते’ असे पुस्तकरुपातून सांगणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या “चार नगरांतले माझे विश्व” या आत्मचरित्रालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यातूनही त्यांच्या साहित्यकृतींचे वैशिष्ट्य आणि गुणवत्ता लक्षात यावी.
डॉ. जयंत नारळीकर, पुणे. या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहानथोरांची शेकडो पत्र येत. या पत्रातील विज्ञान विषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहीले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक – भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता होती. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.












































































