आपला दिवस कसा जाणार आहे, हे खूप अंशी आपल्या सकाळी कसं वाटतं यावर अवलंबून असतं. सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटणं, पोट साफ होणं आणि मन प्रसन्न राहणं यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात. मात्र अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी घेतलेले काही घरगुती व आयुर्वेदीय उपाय हेच सकाळच्या ताजेपणाचा खरा पाया ठरतात.
आपल्या आजी-आजोबांकडून आपण अनेकदा ऐकलेलं असतं “रात्री बडीशेप खा, पचन चांगलं होतं.” पण आजच्या धावपळीच्या युगात अशा साध्या सवयी आपण मागे टाकतो. आणि मग सकाळचा आरंभच गडबडीत होतो. पोट साफ होत नाही, डोकं जड वाटतं, आणि दिवसभर त्रास होतो.
यावर उपाय अगदी घरच्या घरी आहे बडीशेप. बडीशेप हा अशाच घरगुती उपायांपैकी एक प्रभावी घटक आहे. रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा बडीशेप चावून खाल्ल्यास किंवा बडीशेप उकळलेलं कोमट पाणी प्यायल्यास, पचनसंस्था सक्रीय होते. बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक तेलं असतात, जी गॅसेस, अपचन, आणि पोट फुगणं यावर फायदेशीर ठरतात. सकाळी उठल्यावर पोट साफ होतं आणि शरीर हलकं वाटतं. बडीशेप ही केवळ एक मसाला नसून, ती आपल्या शरीराची ‘रात्रीची स्नेही’ बनू शकते. नियमित ही सवय लावली, तर औषधांची गरज भासत नाही आणि सकाळी तुमचा दिवस नवचैतन्याने सुरू होतो.
यासोबतच त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घेणं, कोमट दूधात तूप मिसळून पिणं किंवा इसबगोलसारखे उपाय सुद्धा पचनाच्या दृष्टीने उपयुक्त मानले जातात. हळदीचं दूध देखील शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करतं. या उपायांचा वापर नियमितपणे केल्यास पचनसंस्था बळकट होते आणि शरीर साखर, तुपकट किंवा भारी अन्नावरही नीट प्रक्रिया करू शकतं.
दुसरीकडे, झोपण्याआधी थंड पेये, तळलेले पदार्थ किंवा फार उशिरा जेवण घेणं हे टाळावं, असं वैद्य सांगतात. रात्री उशिरा व असमय जेवल्यास ते शरीरावर अतिरिक्त ताण निर्माण करतं आणि झोपेत अडथळा येतो.
संपूर्ण आरोग्यसंपन्न दिनक्रमासाठी सकाळी उठल्यावर पोट साफ होणं आणि मन प्रसन्न असणं आवश्यक आहे. यासाठी महागड्या गोळ्या किंवा औषधांपेक्षा आयुर्वेदाने दाखवलेले हे घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात. विशेषतः बडीशेपसारखे सहज उपलब्ध असणारे घटक केवळ पचन सुधारण्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण आरोग्यासाठी हितकारक ठरतात.
हे उपायही ठरतात प्रभावी
-
गवती चहा (हर्बल टी) : रात्री झोपण्याआधी आले, लवंग, वेलदोडा टाकून उकळलेला गवती चहा घेतल्यास पोट मोकळं होतं आणि झोप चांगली लागते.
-
त्रिफळा चूर्ण : एक चमचा त्रिफळा गरम पाण्यासोबत घेतल्यास आतड्यांची साफसफाई होते.
-
गायीचं तूप + दूध : कोमट दुधात एक चमचा देशी तूप मिसळून घेतल्यास वातदोष कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते.
-
इसबगोल भूसी : पचनास अनुकूल, आणि सकाळी सहज मलविसर्जनास मदत.
-
हळदीचं दूध : अॅन्टीसेप्टिक व अॅन्टीइंफ्लेमेटरी घटक असलेलं हे मिश्रण शरीर शुद्ध करतं.
झोपण्यापूर्वी ‘हे’ टाळा
-
थंड पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स
-
तळलेले पदार्थ
-
फार उशिरा जेवण
-
मोबाईल/टीव्ही पाहत खाणं
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे. आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे. लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.)