राज्यभरातून उत्कृष्ट शिक्षक व शाळांची निवड; नव्या युगात शैक्षणिक नेतृत्वाला मिळणार प्रोत्साहन
मुंबई । गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने “आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था/शाळांची बँक” तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर समित्या स्थापन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक व शाळांची निवड केली जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी करत आहे. यातच राज्यभरातील नवोपक्रमशील, सृजनशील, गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी केंद्रित काम करणाऱ्या शिक्षक व शैक्षणिक संस्थांचा गौरव करण्यासाठी ही विशेष योजना हाती घेण्यात आली आहे.
या निवडीसाठी विविध मूल्यांकन निकष निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपासून ते शाळेतील उपक्रमांमध्ये सहभाग, प्रशिक्षण, जनजागृती, उपस्थिति आणि पर्यावरण पूरक योगदानाचा विचार केला जाणार आहे. शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेतील कामगिरी, स्वच्छता, परीक्षा व स्पर्धांतील यश, पुस्तक वाचन, शाळा व्यवस्थापनातील सहभाग, लोकसहभाग आणि डिजिटायझेशनसारख्या गोष्टींचा विचार केला जाणार आहे.
या उपक्रमाचा उपयोग अन्य शाळा व शिक्षकांसाठी मार्गदर्शन, प्रेरणा आणि नवनवीन उपक्रमांची देवाणघेवाण साधण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी आयडॉल शिक्षक व शाळांच्या कार्याचा दस्तऐवजीकरण करून व्हिडिओ, ऑडिओ, मजकूर स्वरूपात माहिती तयार करण्यात येईल आणि ती राज्यशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व जिल्हा संस्थांद्वारे प्रचारित केली जाईल.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा एक नवा अध्याय सुरु होणार असून उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना हक्काचा सन्मान आणि इतरांसाठी प्रेरणास्थान मिळणार आहे.