सिंधुदुर्ग । देवगड हापूस आंब्याच्या नावानं बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्याची विक्री रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेन यावर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅम्परप्रूफ यूआयडी सील सक्तीचं करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था हि हापूसच्या भौगोलिक टॅगची नोंदणीकृत प्रोप्रायटर असलेली संस्था आहे. संस्थेच्या वतीने यावर्षीपासून हापूस आंब्यावर टॅम्परप्रूफ सील युनिक कोड अर्थात यूआयडी कोड लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नवीन पद्धतीनुसार प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर हा यूआयडी स्टिकर लावणं बंधनकारक होणार आहे . त्यामुळे बाजारात होणाऱ्या बनावट हापूस आंब्याच्या विक्रीवर अंकुश येणार आहे.
ग्राहकांना केवळ देवगड अस्सल हापूस आंब्याची विक्री व्हावी यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेन हे पाऊल उचलल आहे. सध्या देवगड हापूस या नावान विकले जाणारे ८० टक्के पेक्षा जास्त आंबे देवगड मधले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय, हे लक्षात घेत सहकारी संस्थेन हि पद्धत लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक अस्सल हापूस आंब्यावर यापुढे स्टिकर असेल आणि ग्राहक व्हाट्सअपवर फोटो पाठवून शेतकऱ्याची माहिती सहज तपासू शकतील.
या पद्धतीमुळे देवगड हापूस आंब्याच्या जीआय अर्थात जिओग्राफिकल इंडिकेशन नोंदणीला देखील संरक्षण मिळेल. तसंच जीआय कायदा १९९९आणि भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार बनावट विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.आता पर्यंत एक कोटी स्टिकर्स तयार करण्यात आले असून देवगडमधल्या ३०८ शेतकऱ्यांनी ५० लाखाहून अधिक स्टिकर्स घेतले आहेत. अशाप्रकारे देवगड हापूस आंब्याची अस्सलता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
Courtesy: Prasar Bharati