दुबई :
आयपीएल २०२१ चा अंतिम सामना आज शुक्रवारी ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स आणि २ वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये दुबई आतंरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात येणार आहे.कोलकाता संघाने दोनदा आयपीएलचा कप मिळवला असून एकाही फायनलमध्ये हरलेला नाही. मात्र या हंगामातील दोन्ही साखळी सामन्यांत चेन्नईची सरशी झाली आहे.
सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे.आयपीएल २०२१ च्या दोन्ही साखळी सामन्यांमध्ये चेन्नईने कोलकाताला नमवले आहे.
आयपीएल २०१२ च्या अंतिम सामन्यात कोलकाताने चेन्नईला हरवले होते. आयपीएल २०२१ च्या भारतातील हंगामात कोलकाताने ७ पैकी २ विजय आणि ५ पराभव पत्करून सातव्या स्थानी आपले स्थान निश्चित केले होते.
कोलकाता संघाने आधी गोलंदाजी करत ६ सामने जिंकले
चेन्नईची ३ साखळी सामन्यांत आधी फलंदाजी, पराभव झाला. आधी गोलंदाजी करून ४ सामने जिंकले. कोलकात्याने दुसऱ्या टप्प्यात ६ सामने पाठलाग करून जिंकले.
चेन्नई ९ व्यांदा फायनलमध्ये, ३ वेळाच मिळाले विजेतेपद
चेन्नई संघ आतापर्यंत आठवेळा अंतिम सामन्यात पोहचली आहे. तर आत्ताच्या स्पर्धेची त्यात गणना केली तर नवव्यांदा सीएसके फायनलमध्ये गेला आहे. आतापर्यंत सीएसकेने तीनदा विजेतेपद तर ५ वेळा उपविजेतेपद मिळवले आहे. यामुळे आजचा सामना जिंकत सीएसके चौथा किताब आपल्या नावावर करणार का हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज
बलस्थान : संघाचे सर्वात मोठे बलस्थान ऋतुराज गायकवाड व डुप्लेसिस ही सलामीची जोडी आहे. संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात या दोघांचे महत्त्वाचे योगदान राहिले. गोलंदाजीत शार्दूलसोबत दीपक व हेजलवूड बळी घेत आहेत.
दुबळेपण : मधल्या फळीत सातत्याचा अभाव आहे. धोनीची बॅट केवळ पात्रता सामन्यात चालली. २०० वा सामना खेळणारा जडेजा दुसऱ्या सत्रात ८ सामन्यांत ५ बळी घेऊ शकला.
काेलकाता नाइट रायडर्स
बलस्थान : संघाचे अव्वल-४ फलंदाज अय्यर, गिल, राणा व त्रिपाठी सलग धावा करत आहेत. दुसऱ्या सत्रात संघाच्या यशाचे श्रेय अय्यरला दिले जातेय. युवा खेळाडू शिवम मवी व लुकी फर्ग्युसनसह वरुण व सुनील नरेन फलंदाजांना टिकण्याची संधी देत नाहीत.
दुबळेपण : माजी कर्णधार कार्तिक व सध्याचा कर्णधार मॉर्गन अपयशी ठरले. मॉर्गन सत्रात १० वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे संघाची फलंदाजी अखेरच्या षटकांत डळमळते.