मुंबई । एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी, कमाल वयोमर्यादेत वाढ करायला मंजुरी देण्यात आली आहे. सदर शिथिलता ही एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध केला आहे.
आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी २०२४ ते २० डिसेंबर २०२४ पर्यंत पदभर्तीकरिता ज्या जाहिराती नव्यानं प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षांची शिथिलता देण्यात येत आहे, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
राज्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली.
त्या अनुषंगानं पदसंख्या आणि आरक्षण नमूद करुन मागणीपत्र सुधारित करण्याची कार्यवाही आवश्यक होती. सुधारित मागणीपत्रानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यास आयोगाला २०२४ च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणत: ९ ते १० महिने विलंब झाला होता. त्यामळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्यानं परीक्षेसाठी ते अपात्र ठरत होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या या निर्णयामुळे एमपीएससीच्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
Courtesy : Prasar Bharati
Recent Posts
बातमी शेअर करा : थंडीचा एखादा झोत अंगावरून गेला की आपले शरीर थरथरते आणि काही तरी गरम गरम हवेसे वाटायला लागते. परंतु गरम कपड्यांनी फार काही साध्य होत नाही. शेवटी गरम कपडे हा बाहेर... Read more










































































