Last Updated on 25 Nov 2024 8:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका खाजगी कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले आहेत. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचं सरकार आणि मुख्यमंत्री पदाविषयीही पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,अशी भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपा आमदार नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांचं नेतृत्व आणि प्रशासकीय अनुभव महाराष्ट्रानं पाहिला आहे, त्यामुळे महायुतीचं सरकार चालवण्याचं कौशल्य यांच्याकडे असल्याचं दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत १३२ जागा जिंकत भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ, २६ नोव्हेम्बरला समाप्त होणार आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं.
विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत यशाचं श्रेय तिघांना एकसमान-प्रफुल पटेल
विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एकसमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील आणि त्यामुळे यावरून संघर्ष निर्माण होणार नाही, असंही ते म्हणाले.












































































