Last Updated on 10 Nov 2024 5:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रावेर । महाविकास आघाडीनं लाडकी बहीण योजनेला विरोध केला आहे. मविआचं सरकार आल्यास महिलांना मिळणारा या योजनेचा पैसा बंद होईल. मात्र महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करुन या योजनेतली रक्कम वाढवून २१०० रुपये करण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी केलं.
रावेर इथल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. १० नोव्हेंबर हा दिवस महत्त्वपूर्ण असून केवळ महाराष्ट्रच नव्हे , तर संपूर्ण देश शिवप्रताप दिन म्हणून हा दिवस साजरा करतो, असं सांगून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या तत्वानुसार चालणारं भाजपा महायुतीचं सरकार राज्यात आणावं, असं आवाहन त्यांनी केलं.
राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा निवडून द्यावं, असं आवाहन करत शंभर दिवसात महाराष्ट्र व्हिजन योजना राबवून राज्याला देशातलं अग्रेसर राज्य घडवण्याचं आश्वासन मलकापूर इथल्या प्रचारसभेत त्यांनी दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित करण्याचं काम केलं आहे. केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना दहशतवादी पाकिस्तानातून येऊन बॉम्बस्फोट करुन निघून जात. त्यासंदर्भात कारवाई होत नसे, मात्र २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर उरी आणि पुलवामा इथं हल्ला झाल्यावर १० दिवसातच पाकिस्तानमध्ये जाऊन लक्षभेदी आणि हवाईहल्ला केल्याचं अमित शहा यांनी सांगितलं. २० तारखेला तुमचं एक मत,केवळ आमदार नव्हे केवळ सरकार नव्हे, तर आपलं एक मत भारताला जगामध्ये सर्वोच्च स्थानी नेईल, असं शाह म्हणाले.












































































