Last Updated on 10 Nov 2024 4:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आमच्याच योजनांची कॉपी भाजप सरकारने केली; मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका
मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाराष्ट्रनामा असे नाव देण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय करणार याचा तपशील यावेळी देण्यात आला.महिलांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच बेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार रुपये मानधन देण्यात येणार. तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणाही या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले. महालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना ३ हजार रुपये, महिलांना मोफत बस सेवा, विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, बेरोजगारांना नोकरी शोधण्यासाठी दरमहा ४ हजार रुपये, शेतकऱ्यासाठी कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपार अनुदान, २५ लाखापर्यंत आरोग्य विमा, जातनिहाय जनगणना करणार, घरगुती सिलेंडर ५०० रुपयेला मिळणार, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार, १०० युनिट पर्यंत वीजबिल मोफत, रोजगार निर्मितीसाठी नवीन ओद्योगिक धोरण करणार, २.५ लाख सरकारी रिक्त पदे भरणार, इंदू मिल इथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणार, महिलांसाठी ५ लाखापर्यंत कमी व्याजदराने कर्जपुरवठा करणार, कंत्राटी भारती धोरणाला स्थगिती देणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरीडॉर तयार करणार, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती तयार करणार, युवा आयोगाची स्थापना करणार, आनंदी शहरे तयार करणार यासह विविध प्रकारची आश्वासने या महाराष्ट्रनामा या पत्रिकेत देण्यात आली आहेत.
यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, महाराष्ट्राची ही निवडणूक केवळ महारष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्वाची आहे. देशाचे भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला जाहीरनामा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आमदारांना खरेदी करून असंविधानिक सरकार तयार करण्यात आले आहे. हे सरकार आम्हाला घालवायचे आहे. आम्ही जी वचने कर्नाटकमध्ये दिली त्याची अंमलबजावणी आम्ही केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत, असे ते म्हणाले. आमच्याच योजनांची कॉपी भाजप सरकारने केली असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील ठळक घोषणा
१) शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यास ५० हजारांची सूट
२) आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
३) जाती जणगणनना करणार
४) ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांना १०० युनिट वीज मोफत
५) दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
६) महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’
७) कायद्याची अंमलबजावणी करणार
८) २.५ लाख नोकरभरती करणार
९) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
१०) शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
११) सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा ४ हजार मानधन
१२) अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
१३) बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
१४) एमपीएससी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावणार
१५) महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
१६) महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
१७) महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
१८) शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
१९) सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
२१) महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
२२) बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
२३) कंत्राटी नोकरभरती बंद करणार
२४) महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
२५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
२६) सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
२७) शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
२८) जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
२९) वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
३०) युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार












































































