नवी दिल्ली । प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत देशात गरजूंना फोर्टीफाईड म्हणजेच अतिरिक्त पोषणमूल्य असलेला तांदूळ मोफत वितरीत करण्याचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
२०२४ ते २८ या कालावधीत हा कार्यक्रम सुरु राहणार असून, त्यासाठी १७ हजार ८२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. हा सर्व निधी केंद्र सरकार देणार असल्याचं माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. देशातल्या जनतेचं पोषण विशेषत: माता आणि बालकांना पोषणयुक्त आहार मिळावा या हेतूनं फोर्टीफाईड तांदळाची पुरवठा साखळी विकसित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विकास आणि वारसा एकाचवेळी साध्य करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणानुसार सागरी वारशांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
गुजरातच्या लोथल या सागरी किनाऱ्यावरच्या पर्यटनस्थळाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. या पर्यटन स्थळावर राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित केलं जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. हे जगातलं सर्वात मोठं वारसा संकुल असेल, ज्यात त्या काळातल्या सर्व प्रतिकृती तयार केल्या जातील, असं ते म्हणाले.
या उपक्रमातून २२ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या सीमावर्ती भागांच्या पायाभूत सुविधा वाढवण्याचं काम सरकार करत आहे. त्यालाच जोड म्हणून राजस्थान आणि पंजाब इथल्या सीमावर्ती भागात दोन हजार २८० किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. यासाठी चार हजार ४०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.