आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन
कोल्हापूर । आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वांत महत्त्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे आणि यासंबंधीचा कायदा आम्ही संसदेत मंजूर करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे. ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं, जनतेनं घडवलेली आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारातून राज्यघटना साकारली असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. शिवरायांच्याच विचारधारेचा संघर्ष आज राज्यघटना संपवू पाहणाऱ्या विचारधारेशी सुरू आहे, असं त्यांनी नमूद केलं. कोल्हापुरात कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते झाले.
यावेळी भाषणात राहुल गांधी म्हणाले की, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतोय, पुतळा असाच उभारला जात नाही तर आपण एखादा व्यक्ती, त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो तेव्हा उभारला जातो असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. मात्र तो पुतळा काही दिवसातच कोसळला. कारण यांची विचारधारा चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं यांना इशारा दिला. पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला,” असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.
कार्यक्रमासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, काँग्रेसचे नेते मोहन जोशी, कुमार चौधरी, नसीम खान, उल्हास पवार, आमदार भाई जगताप, विश्वजीत कदम, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राजू आवळे, जयंत आसगावकर, युवराज मालोजीराजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डी वाय पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन साऱ्यांचे स्वागत केले. आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती भेट दिली. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता. सकाळी दहा वाजता विमानतळावर राहुल गांधी यांचं आगमन झालं.
टेम्पो चालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट…
विमानतळावरून निघताना त्यांनी कार्यक्रमस्थळी न जाता थेट कोल्हापुरातल्या उचगाव इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणाऱ्या टेम्पो चालक अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली. अचानक राहुल गांधी स्वतः घरात आल्यानंतर सनदे कुटुंबीय भारावून गेलं. खासदार राहुल गांधी हे सनदे यांच्या घरी पाऊण तासांहून अधिक काळ थांबले. यावेळी राहुल गांधी यांनी सर्वांनाच एक सुखद धक्का दिला. आज ही सनदे यांच्या कौलारू घरात जाऊन राहुल गांधी यांनी चहा तर घेतलाच पण घरातील गृहिणीची परवानगी घेऊन स्वयंपाक खोलीचा काही काळासाठी ताबा घेतला. स्वतः कांदापात चिरुन त्यांनी भाजी बनवली. सनदे यांच्या कुटुंबीयांसोबत सहभोजनाचा आनंद घेतला.