काळमवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील कार्यशाळा!
सांगली । काळमवाडी ता. वाळवा येथील जिल्हा परिषदेची शाळा सातत्याने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारी वाळवा तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा आहे. या शाळेत पर्यावरणपूरक आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आकाश कंदील बनवण्यासाठी प्लास्टिकचा वापर अजिबात न करता कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. आनंददायी शनिवार अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील २६५ विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी कागदापासून आकर्षक आकाशकंदील तयार केले. इयत्ता पहिली दुसरीच्या बालचमुंनीही आकाश कंदील बनवण्याचा मनमुराद आनंद घेतला.
जागर शिक्षणाचा प्रणेते, उपक्रमशील शिक्षक दीपक रोकडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे संयोजन करण्यात आले. शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचे साधक सुहास प्रभावळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. सिद्धेश हांडे आणि पार्थ पानसकर या दोन विद्यार्थ्यांनीही मोलाची साथ दिली.
विद्यार्थ्यांच्या मधील कृती कौशल्याला वाव मिळावा. विद्यार्थ्यांच्या हस्त कौशल्यालाही संधी मिळावी. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा. त्यांच्यातील सर्जनशीलता वाढावी. त्यांच्यातील कल्पकतेला संधी मिळावी. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागावी. सन समारंभ साजरे करताना पर्यावरण संरक्षणाचे भान विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी, अशा अनेक उद्देशाने जिल्हा परिषद शाळा काळमवाडीमध्ये पर्यावरण पूरक आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा घेण्यातआली. आणि या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसादही प्रचंड मिळाला.
दसरा दिवाळी हे सण जवळ आले आहेत. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून संबंध भारतभर साजरा केला जातो. अलीकडे दिवाळीला घरोघरी तयार प्लास्टिकचे आकाश कंदील विकत आणले जातात. या तयार आकाश कंदीलांसाठी प्लास्टिकचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, आणि त्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करणे हाही या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. प्लास्टिक टाळा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश या निमित्ताने समाजापर्यंत जातो आहे.
यावर्षीच्या दिवाळीला पर्यावरणपूरक आकाश कंदील फक्त रंगीबेरंगी कागदापासूनच बनवणार. त्यासाठी प्लास्टिकचा वापर अजिबात करणार नाही. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करणार. पर्यावरणाचे रक्षण करणार. स्वतः दिवाळीसाठी आकाश कंदील बनवणार . समाजातील इतरांनाही पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार करण्यास सांगणार,अशी शपथही सर्वच विद्यार्थ्यांनी घेतली.
यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापिका सुवर्णा बच्चे, दीपक रोकडे, सुनील हवालदार, राहुल मोरे, सुहास पाटील, सचिन बामणे, सुनिता कदम, स्नेहा जाधव, संगीता सुपने, मनीषा काटवटे यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
प्लास्टिक मुक्त समाजासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवण्याचा या शाळेचा हा उपक्रम सर्वांना पथदर्शी ठरेल, हे निश्चित!
आमच्या काळमवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवण्यासाठी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्वच विद्यार्थ्यांची घेतलेली कार्यशाळा पर्यावरण रक्षणासाठी या शाळेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्लास्टिकचा वापर टाळून यावर्षीची दिवाळी या उपक्रमाच्या माध्यमातून साजरी होणार आहे. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना निश्चितपणे वाव मिळाला आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा मोठा आनंद यातून निश्चितच मिळाला आहे. सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दीपक रोकडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेला हा उपक्रम उल्लेखनीय आहे. काळमवाडी गावच्या वतीने या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा !
सौ. सविता सावंत
लोकनियुक्त सरपंच
काळमवाडी
नेर्ले केंद्रातील जिल्हा परिषद शाळा काळमवाडीतील, उपक्रमशील शिक्षक दीपक रोकडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जिल्हा परिषद शाळा काळमवाडी येथे पर्यावरण पूरक आकाशकंदील बनवण्याचा राबवलेला उपक्रम सर्वच शाळांना अनुकरणीय आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासास निश्चितपणे चालना मिळणार आहे. याशिवाय प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळण्याचा संस्कारही विद्यार्थ्यांच्या मनावर आपोआपच कोरला जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचा निश्चितपणे विकास होईल. या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा !
राजेंद्र पाटील
केंद्रप्रमुख, नेर्ले
पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम स्तुत्य आहे. आदर्श शिक्षक दीपक रोकडे यांच्या संकल्पनेतून खूप चांगला उपक्रम राबवला गेला आहे. आनंददायी शनिवार या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कौशल्य विकास झाला वाव देणारे विविध उपक्रम ते सातत्याने या शाळेत राबवत आहेत. त्यामुळे आनंदही शिक्षणाची संकल्पना दृढ होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.
बजरंग सावंत, अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती
जि. प. शाळा काळमवाडी
सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे सातत्याने प्लास्टिकमुक्त पर्यावरणासाठी आग्रही आहेत. प्लास्टिक निर्मूलनासाठी व्यापक चळवळ त्यांनी जिल्हाभर उभारली आहे.पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवल्यामुळे प्लास्टिकचा वापर आपोआपच थांबेल आणि पर्यावरण रक्षणास त्याची नक्कीच मदत होईल. सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, वाळवा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार, शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम शाळा स्तरावर राबवला आणि कमालीचा यशस्वी झाला आहे. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दीपक रोकडे
जागर शिक्षणाचा प्रणेते