India vs China Hockey Asian Champions Trophy 2024 Final : भारताच्या हॉकी संघाने चीनचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ विक्रमी पाचव्यांदा आशियाई ट्रॉफीचा पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताकडून जुगराज सिंगने एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. चीनने अखेरच्या सेकंदापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंनी कडवी झुंज देत विजय आपल्या नावे केला. चीनने पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर पाकिस्तानच्या संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत तिसरे स्थान मिळवले.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर, पाकिस्तानला हरवून चीनने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आज भारताची चीनशी सामना होता. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बलाढ्य भारतीय संघाला चीनने तगडे आव्हान दिले. पण चौथ्या सत्रात भारतीय संघाने कमाल करत १-० ने आघाडी घेत पाचव्यांदा जेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांदा भारताने जेतेपद मिळवले आहे.
चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाला गोल करता आला नव्हता. सलामीच्या सामन्यात ज्या चीनला भारताने सहज मात दिली तो संघ एका वेगळ्या उद्देशाने खेळताना दिसला. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीला काही संधी निर्माण केल्या. पण चीनच्या गोलीने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत भारताचे प्रयत्न अपयशी ठरवले. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत एकाही संघाला गोल नोंदवता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताकडून जुगराज सिंगने एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. चीनने अखेरच्या सेकंदापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंनी कडवी झुंज देत विजय आपल्या नावे केला.