जळगाव येथे 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देवून त्यांच्याशी संवाद साधणार
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जळगाव येथे 25 ऑगस्ट रोजी 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देवून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमासंदर्भात शिवराजसिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानीही उपस्थित होते. कृषी मंत्री चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दीदींशी संवाद साधतील आणि नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रही देतील. या कार्यक्रमात पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी जारी करणार आहेत.
या निधीचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना लाभ होईल. पंतप्रधान 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील जारी करणार आहेत. त्यामुळे 2,35,400 बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होईल. यावेळी चौहान यांनी सांगितले की, 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्यांच्या राजधानीत सुमारे 30,000 ठिकाणांचे जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.
ज्या महिला वार्षिक 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमावतात, त्या लखपती दीदी आहेत, असे सांगून शिवराज सिंह चौहान म्हणाले की, या लखपती दीदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरीबीतून बाहेर काढले नाही तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत. आता आमचे लक्ष्य पुढील 3 वर्षांत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे. यापैकी एका सीआरपीने 95 लखपती दीदी तयार केल्या आहेत, ही गोष्ट आनंददायक असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, मंत्रालयाने बचत गटांच्या कुटुंबांना 1 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न मिळविण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी एक संरचित प्रक्रिया स्वीकारली.