खुशखबर! ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार
मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यभरातील शाळा आता ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे.त्यामुळे अखेर राज्यभरातील शाळांची घंटा वाजणार आहे.राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शाळा कोरोना नियमांचे पालन करून सुरू केल्या जात आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर, शाळा सुरू कधी होणार? याबाबतची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर, ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहे.
यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करावे लागले. पण ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण काहीसे कमी होत असल्यामुळे सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) घेतलेल्या सर्वेक्षणात ८१.१८ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचा निष्कर्ष दिसून आल्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास ७ जुलैला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास सुरू करण्यासही शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे मान्यता दिली होती.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार
शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार
मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे
शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसणार
यापूर्वीही राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत. केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यावर आता मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे.
कोरोना नियम पाळून शाळा सुरु होणार
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.