सांगली । उत्सुकतेपोटी अनेकदा मुले पाण्यात वाकून पाहतात आणि चूक घडते. मुलं जीवाला मुकतात. मग पालक हतबल होतात. लहानपणापासूनच मुलांना अशा सुरक्षितता बाळगण्याची गरज आहे. यासाठी शुक्रवारी जलदिनी इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी जलदिनाचे औचित्य साधले गेले.पाणी बचत आणि जल सुरक्षिततेबाबत उपक्रमातून माहिती देण्यात आली.
इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये सहा वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून आणि अनुभवातून शिक्षण देण्यात येते.आज जल दिनाच्या निमित्ताने आयोजित उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.
लहानपणी मुलांना एखाद्या चुकीची जाणीव नसते. तेव्हा अजाणतेपणी चुका घडतात. पाण्यात वाकून पाहताना बादली,हौदामध्ये पडून दुर्घटना घडल्याच्या अनेक घटना आहेत. असे प्रकार लहान मुलांच्या जीवावर बेततात.
लहान मुलांना पाण्यापासून सुरक्षित कसे रहावे याबाबत माहिती देण्यात आली. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीबाबत प्रचंड उत्सुकता असते. या उत्सुकतेपोटी मुलं चुका करतात. आपण केलेली कृती योग्य की अयोग्य याबाबत त्यांना जाण नसते. किंवा पालक मुलांना याबाबत जाणीवपूर्वक माहिती देताना कमी पडतात. यामुळे मुक्तांगण प्ले स्कूलच्या चिमुकल्या मुलांना विविध उपक्रमातून आज जलदिनी पाण्यापासून सुरक्षितता व पाण्याची बचती कशी करता येईल याबाबत माहिती देण्यात आली.
वाकून पाहताना उत्सुकता कमी झाल्याने संभाव्य धोके टाळता येतील. यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. विविध आकारातील पिंप,हौद,बादली यात वाकून पाहू नका.वाकून पाहून पडल्यानंतर नेमके काय होते याची जाणीव मुलांना करून देण्यात आली.
स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते म्हणाल्या,” एखादी गोष्ट करू नको असे मुलांना सांगितले तर मुलं उत्सुकतेपोटी ती गोष्ट नक्की करतात. आज आम्ही मुलांची बादली, टप,हौद, बॅरेल मध्ये वाकून पाहण्याची उत्सुकता कमी केली. हे केल्याने काय होते हे समजावून सांगितले. मुलं चुका करणार नाहीत याकडे पालकांचे लक्ष हवे.”