Last Updated on 28 Jan 2024 6:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जालना । कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही,असे ते म्हणाले. तसेच उद्या रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईमधील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा बांधवांची बैठक बोलावली.या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.कायदा केला तर फायदाही झालाच पाहिजे.त्यामुळे मराठा आरक्षणासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे सग्या-सोयऱ्याला किमान एक तरी प्रमाणपत्र मिळत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा सरकारने काल अध्यादेश काढला.ज्याची कुणबी म्हणून नोंद मिळाली आहे,त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला त्या कागदपत्राच्या अंतर्गत एक तरी प्रमाणपत्र मिळायला हवं हे प्रमाणपत्र मिळत नाही,तोपर्यंत हे आंदोलन राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
फायदाच झाला नाही तर काय?
सगेसोयऱ्यांचा कायदा झाला आणि त्याचा फायदा कुणालाच झाला नाही तर? त्यामुळे सावध राहावे लागेल. हे आंदोलन गाफील ठेवून चालणार नाही. समाजाची फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली फसवणूक करु नये. कायदा पारित केलाय. पण त्यापासून मिळाले काय? तो नुसताच कागदावर राहू नये. सगेसोयऱ्याचा कायदा झाला, पण त्याचा फायदाच झाला नाही तर त्याचा उपयोग काय? 1 जून 2004 रोजी मराठा कुणबी एकच आहेत. असा कायदा पारित झाला. त्याला आता 18 वर्ष झाली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो केला कशाला? त्यामुळे आपण आता सावध आहोत, गाफील राहणाऱ्यांचे आंदोलन फसते. मराठा समाजाने सरकारचे कौतूक केले आहे. पण, कायद्याचा उपयोग होईपर्यंत आपण बेसावध का राहायचे? असा सवाल करत त्यांनी हे आंदोलन सुरुच राहील असे स्पष्ट केले आहे.
सोयऱ्याला पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी सभा घेऊ.तोपर्यंत कोणताही विजयी कार्यक्रम घ्यायचा नाही.जो कार्यक्रम घ्यायचा त्यातून फायदा झाला पाहिजे.पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सभा घेऊ असेही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.












































































