Last Updated on 20 Jan 2024 7:30 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील 16 वर्षाखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले.रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे.
ही मार्गदर्शक तत्वे बारावीनंतर जेईई, एनईईटी, सीएलएटी आदी प्रवेश परीक्षा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या कोचिंग क्लासेससाठी बनवली आहेत.विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या,क्लासेसमध्ये लागलेली आग, कोचिंग सेंटरमधील सुविधांची कमतरता आदी बाबी पाहून शिक्षण विभागाने ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग क्लाससाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.त्यानुसार 16 वर्षाखाली विद्याथ्यांची कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करू नये,दिशाभूल करणारी आश्वासन देऊ नये,चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही अशी नियमावली जाहीर केली आहे.कोचिंग क्लासेसच्या संस्थांचे नियमन करण्यासाठी कायदेशीर चौकट गरजेचे असल्याचेही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
गाईडलाईन्समध्ये हे आहे…
या मार्गदर्शक तत्वानुसार, पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षकांना नियुक्त करता येणार नाही, कोचिंग सेंटर्सकडून पालकांना भ्रामक आश्वासने देता येणार नाही. समुपदेशन यंत्रणेशिवाय कोणत्याही कोचिंग क्लासेसची नोंदणी केली जाणार नाही. क्लासना आपल्या शिक्षकाची पात्रता, अभ्यासक्रमाचा कालावधी, हॉस्टेल व फी आदींची माहिती दिली पाहिजे. कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना होणाऱ्या मानसिक तणावावर लक्ष दिले पाहिजे, तणावपूर्ण वातावरणातून बाहेर पडण्यासाठी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. मानसशास्त्रज्ञ, समुपदेशकाचे नाव, त्यांच्या कामाच्यावेळा आदींची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी ट्यूशन फी ठरवली पाहिजे. तसेच विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाची फी भरली आहे. तसेच निर्धारित वेळेत तो अभ्यासक्रम सोडत असल्यास दहा दिवसात उर्वरित फी त्याला परत केली पाहिजे. अभ्यासक्रमाच्या काळात फी वाढवू नये. या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यास कोचिंग सेंटरवर १ लाख दंड व जास्त फी घेणाऱ्या कोचिंगची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. ही सर्व मार्गदर्शक तत्वे तीन महिन्यांच्या आत लागू झाली पाहिजेत. तसेच सर्व कोचिंग सेंटर नियमांचे पालन करताहेत त्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील.
एक लाख दंड अन्…
खासगी कोचिंग क्लासच्या बेफाम वाढीला लगाम घालण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्यासाठी एक नियमावली तयार केली आहे. या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
तर 10 दिवसांमध्ये फी परत
नव्या नियमांनुसार, एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. हॉस्टल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल.
पाच तासांपेक्षा जास्त क्लास नाही
शाळा, कॉलेज अथवा एखाद्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत. त्याशिवाय एका दिवसांत पाच तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.












































































