Last Updated on 02 Jan 2024 3:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचेच आहेत आणि त्यांनी अजून तरी कोणा पक्षाकडून एखादी निवडणूक लढलेली नाही.त्यामुळे आम्ही सारे श्रीरामांच्या पार्टीतच आहोत,अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी भवानीनगर (ता.वाळवा) बोलताना केली.
भवानीनगर (ता.वाळवा) येथील जय भवानी मोफत वाचनालयाच्या नूतन इमारती च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सरोज पाटील या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या.क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड,जय भवानी वाचनालयाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर,उद्योगक सर्जेराव यादव,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे,सेवानिवृत्त कर्नल अशोक सायनाकर,सरपंच इंदूताई ताटे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आई-वडीलांनी,तसेच शिक्षकांनी मुलांना वाचनाची गोडी लावावी.वाचनाने माणूस घडतो.प्रत्येकाने वाचन वाढवले पाहिजे.आज वाचनालयात वाचकांची संख्या कमी झाली असली,तरी भविष्यात पुन्हा एकदा वाचन संस्कृती वाढीस लागेल.सध्या ज्ञान हे प्रगतीचे मुख्य साधन बनलेले आहे.गावातील शाळा,वाचनालये ही गावांची आत्मा आहेत.भविष्यात जी गांवे,आपल्या शाळा,वाचनालये अधिक समृध्द करतील,ती गांवे अधिक गतीने प्रगती साधतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरोज पाटील म्हणाल्या,आपले काम चांगले असले,तर समाज नेहमी पाठीशी उभा राहतो. आमच्या घरातील प्रत्येक सदस्यास वाचनाची आवड लहानपणापासून होती. सायनाकर कुटुंब हे भवानीनगर गांवचे भूषण असून हे कुटुंब दानशूर आहे.
प्राचार्य विश्वासराव सायनाकर म्हणाले, आपल्या गावात एक सुसज्ज वाचनालय असावे,असे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते, ते आज पूर्ण करताना आनंद आणि समाधान होत आहे. आज या वाचनालयाची दुमजली इमारत उभी आहे. गावातील प्रत्येक घरांतील मनुष्य सुसंस्कारी व सुशिक्षित व्हावा त्यासाठी हे वाचनालय मैलाचा दगड ठरेल.
यावेळी शरदभाऊ लाड,ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे,सेवानिवृत्त उपअभियंता पुरुषोत्तम देशपांडे, सेवानिवृत्त कर्नल अशोक सायनाकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी वाचनालयाचे सचिव शंकर कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उमेश पवार,पै.हणमंतराव पाटील,डॉ.विकास माळी,उद्योजक रघुनाथराव मोहिते,सुभाष मोहिते,जयश्री कदम,भरत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले. प्रा.सुरज चौगुले यांनी सुत्रसंचलन केले.








































































