नवी दिल्ली | भारताने 2014-23 या कालावधीत 396 परदेशी आणि 70 देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले,तर 2003-13 या कालावधीत भारताने 33 परदेशी आणि देशांतर्गत 31 उपग्रह प्रक्षेपित केले होते अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली.
आज लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक,सार्वजनिक तक्रारी,निवृत्तीवेतन,अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, 2014-23 या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल 157 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 260 दशलक्ष युरो इतका आहे. 2003-13 या दशकात संबंधित आकडा 15 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 32 दशलक्ष युरो होता,असे त्यांनी सांगितले.
अंतराळ विभागाला दिलेली वार्षिक आर्थिक तरतूद आर्थिक वर्ष 2013-14 मधील 6,792 कोटी रुपयांवरून 2023-24 साठी 12,544 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. विविध जागतिक अंदाज आणि बातम्यांनुसार, येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ 6-8% दराने होईल, असे त्यांनी सांगितले.