Last Updated on 23 Nov 2023 8:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश; ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य
कोल्हापूर । ऊस हंगामाची कोंडी अखेर गुरुवारी रात्री फुटली.गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी फुटली.त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगळुरू महामार्गावर सुरु केलेले चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
साखर कारखानदारांकडून सकारात्मक भूमिका न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली.राजू शेट्टी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केले.सकाळी साडे अकरा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली होती.माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो शेतकरी पुणे-बेंगलोर महामार्गावरील चक्का जाम करण्यासाठी शिरोली नाक्यावर एकवटले होते.दुसऱ्या हप्तबाबत साखर कारखानदार जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नसल्याची आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली होती.
त्यानंतर झालेल्या बैठकीत गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी फुटली.राजू शेट्टी यांच्या मागणीला अखेर यश आल्याने आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात तोडगा निघाला आहे.आता सांगली जिल्ह्यातील कारखानदारानी लवकरात लवकर मार्ग काढायचा असल्याचे शेट्टी म्हणाले.
या बैठकीला प्रा.डॉ. जालंदर पाटील, अनिल मादनाईक,धनाजी चुडमुंगे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे आदी उपस्थित होते.
दरम्यान,कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व कारखान्यांची पत्र आल्यानंतर तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील सर्वच कारखानदारानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३१०० रुपये द्यावी,शिवाय जोपर्यंत सर्व कारखान्याचे मागील तुटलेल्या उसाला १०० रुपये उसाचे पत्र येत नाही.तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
![]()
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या नोट मध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन २०२२-२३ मधील शेतक-यांना मिळालेल्या ऊसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदालने सुरु झाली होती त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने,आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतक-यांना ऊसाचा दर प्रती टन रुपये ३,०००/- पेक्षा कमी ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे त्यांनी मागील हंगामातील शेतक-यांना रुपये १००/- अतिरिक्त प्रती टन द्यावे व ज्यांनी रुपये ३,०००/- पेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे त्या साखर कारखान्यांनी रुपये ५०/- प्रतीटन अतिरिक्त शेतक-यांना द्यावेत.याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी मा. पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांना दिलेले आहे.तसेच, दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतक-यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना मा. पालकमंत्री यांनी केले आहे. या आश्वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव ऊसाचे दर मागणी विषयीचे आंदोलन व आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.
![]()













































































