एमबीबीएसच्या जागांमध्ये 79 टक्के, एमडीच्या जागांमध्ये 93 टक्के वाढ
नवी दिल्ली । केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय,कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण,निवृत्तीवेतन,अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वैद्यकीय शिक्षण परवडण्याजोगे आणि आवाक्यातील बनवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत,जेणेकरून कोणत्याही पात्र उमेदवारामध्ये डावलले गेल्याची भावना निर्माण होणार नाही.केवळ 9 वर्षांच्या कालावधीत एमबीबीएसच्या जागा 51,348 वरून 91,927 पर्यंत 79 टक्केनी,तर एमडीच्या जागा 31,185 वरून 60,202 पर्यंत 93 टक्के वाढल्याआहेत,अशी माहिती त्यांनी दिली.
2014 मध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 145 होती, त्यामध्ये आता मोठी उसळी घेत भारतामध्ये अशा प्रकारची 260 वैद्यकीय महाविद्यालये निर्माण झाली आहेत तर 9 वर्षांच्या काळात एम्सची संख्या 23 वर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मूमध्ये एसबीआयने एम्सला भेट दिलेल्या 32 आसनी बसला रवाना केल्यानंतर ते बोलत होते. जम्मूमधील बक्षीनगर कँप ऑफिस येथील एम्समध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या लसीकरण कार्यक्रमाबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की संरक्षक आरोग्यनिगा क्षेत्रात भारत एक जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे. यापूर्वी आरोग्यनिगा पुरवठादार म्हणून भारताकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नव्हते, असे त्यांनी नमूद केले.
एसबीआयने भेट दिलेल्या बसमध्ये डॉक्टर ऑन व्हील्सच्या धर्तीवर टेलिमेडीसीन सुविधा सुरू करावी अशी सूचना डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली. दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा पुरवताना त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन नियमावलीचा वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले.