Last Updated on 15 Jul 2023 9:18 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । तिरंदाजी (आर्चरी) या खेळात राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वाळवा तालुक्यातील बहे येथील मयूर सुधीर रोकडे याला महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.राज्य शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.मागील तीन वर्षांचे क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून क्रीडा पुरस्काराची नावे जाहीर केली.राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
मयूर हा वाई (जि.सातारा) येथील किसनवीर महाविद्यालयात पदवीत्तर शिक्षण घेत आहे.मयूर याने या अगोदर विद्यापीठस्तरीय,राज्यस्तरीय,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी करुन अनेक पुरस्कार मिळवले आहेत.पुणे,भुवनेश्वर,बंगळुरू येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.चंदीगड,भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.त्यात त्याला व्यक्तिगत तसेच सांघिक प्रकारात घवघवीत यश मिळाले आहे.
सन 2017 पासून विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला आहे.उस्मानाबाद येथे झालेल्या 18 व्या वरिष्ठ राज्य धनुर्विद्या स्पर्धेत त्याने वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक,पालघर येथे झालेल्या 17 व्या वरिष्ठ राज्य तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम तर सांघिक प्रकारात तृतीय क्रमांक तसेच पेठ वडगाव येथे झालेल्या 16 व्या वरिष्ठ राज्य धनुर्विद्या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात प्रथम तर सांघिक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला होता.
महाराष्ट्र शासनाकडून लवकरच मयूरचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.मयूरचे शांतीनाथ अनुजे,समीर पवार प्रशिक्षक आहेत.मयूरचे वडील सुधीर रोकडे हे बहेचे माजी सरपंच आहेत.वडील सुधीर रोकडे व आई वैशाली रोकडे,चुलते संदीप रोकडे तसेच माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ,विद्याताई पोळ,प्रा. बी.एस.घुगरे,प्रा.एम ए.परीट,प्रा.एस.पी.पाटील,प्रा.सुनील पाटील आदींचे मयूरला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.








































































