Last Updated on 07 May 2023 8:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातल्या तरुणांना भवितव्याच्या संधीं उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, MSDE अर्थात,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने उद्या 8 मे रोजी देशभरातल्या 200 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधल्या कंपन्यां सहभागी होत आहेत.या व्यासपीठाद्वारे,सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकतात,त्यांच्या पात्रतेनुसार जागेवरच प्रशिक्षणार्थींची निवड करू शकतात,तसेच तरुणांच्या उपजीविकेच्या संधींना बळकट करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन या मेळ्यात आपलं नाव नोंदवावे.इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण,कौशल्य रोजगार उमेदवारी प्रमाणपत्र असलेले,आयटीआय प्रमाणपत्रधारक,पदविकाधारक किंवा पदवीधर असलेले अशा विविध शैक्षणिक स्तरांवरचे उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळ्यात अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी त्यांच्या स्वयंपरिचय माहितीच्या तीन प्रती,सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती,छायाचित्र असलेले ओळखपत्र आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणं आवश्यक आहे.












































































