Last Updated on 02 May 2023 11:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महाराष्ट्रात या महिन्यात 33,196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन
एप्रिल 2023 मधील एकत्रित जीएसटी संकलन आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर
नवी दिल्ली । एप्रिल 2023 मध्ये 1,87,035 कोटी रुपयांचे एकत्रित जीएसटी महसूल संकलन झाले आहे. यामध्ये CGST 38,440 कोटी रुपये, SGST 47,412 कोटी रुपये, IGST 89,158 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 34,972 कोटी रुपयांसह) आणि अधिभार 12,025 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीमधून गोळा केलेल्या 901 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्रात एकूण 33,196 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले आहे.
सरकारने IGST मधून नियमित थकबाकीपोटी 45,864 कोटी रुपयांच्या CGST ची आणि 37,959 कोटी रुपयांच्या SGST ची थकबाकी चुकती केली आहे. नियमित थकबाकी चुकती केल्यानंतर एप्रिल 2023 या महिन्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून CGST साठी 84,304 कोटी रुपये आणि SGST साठी 85,371 कोटी रुपये इतका महसूल जमा झाला आहे.
एप्रिल 2023 महिन्यात जीएसटीपोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षी याच महिन्यात संकलित जीएसटी महसुलापेक्षा 12% नी अधिक आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात (सेवांच्या आयातीसह) देशांतर्गत व्यवहारांद्वारे जमा झालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 16% नी जास्त आहे.
देशातील एकूण जीएसटी संकलनाने या महिन्यात प्रथमच 1.75 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या एकूण ई-वे बिलांची संख्या 9.0 कोटी होती. ही आकडेवारी, फेब्रुवारी 2023 मध्ये जारी करण्यात आलेल्या 8.1 कोटी ई-वे बिलांपेक्षा 11% नी अधिक आहे.
एप्रिल 2023 मध्ये 20 तारखेला दैनंदिन पातळीवरील आतापर्यंतचे सर्वाधिक कर संकलन झाले.या दिवशी 9.8 लाख व्यवहारांच्या माध्यमातून, 68,228 कोटी रुपये कर संकलित करण्यात आला. गेल्या वर्षी याच तारखेला एका दिवसातील सर्वात जास्त कर संकलन झाले होते आणि तेव्हा 9.6 लाख व्यवहारांच्या माध्यमातून 57,846 कोटी रुपये संकलित करण्यात आले होते.
खालील तक्ता यंदाच्या वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसूल संकलनाचे प्रकार दर्शवतो. या तक्त्यामध्ये एप्रिल 2022 च्या तुलनेत एप्रिल 2023 मध्ये संकलित झालेल्या जीएसटीची राज्यनिहाय आकडेवारी दिली आहे.













































































