Last Updated on 09 Mar 2023 4:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यात नमो सरकारी शेतकरी योजना जाहीर
मुंबई । उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत.या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या 6 हजार रुपयांसह महाराष्ट्राचे 6 हजार जमा होतील.म्हणजे वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर 12 हजार रुपये जमा होतील.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पेटारा उघडला आहे. केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली.
नमो शेतकरी महा सन्मान निधी
नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला 6 हजार रुपये जमा करेल.केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा करेल.यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे 6 हजार आणि महाराष्ट्र सरकारचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली येणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. 3 वर्षांत 1000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
तसेच, राज्यात सुरू असलेल्या 268 सिंचन प्रकल्पांपैकी 39 प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील 6 प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजनेतील 24 प्रकल्पांचा समावेश आहे.गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास यावर्षी 1500 कोटी देणार. जून 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असेही त्यांनी सांगितले.














































































