Last Updated on 13 Feb 2023 7:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तोंडाचा वास अथवा दुर्गंधी येणं ही सामान्य समस्या झाली आहे. मात्र, आपण या परिस्थितीतून जाणारी पहिली व्यक्ती नाही. कारण, अनेकजण या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.ही दुर्गंधी रोखण्यासाठी अनेक उपायही केले जातात, काही जण नियमित सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करतात, पण समस्या कायम राहते. सकाळी उठल्यावर परत तोंडातून दुर्गंधी येतेच, मग प्रश्न येतो तो, की हे नेमके कशामुळे होते आणि ही समस्या रोखायची तरी कशी?
तुमच्या श्वासामधून दुर्गंधी का येते ?
अनेकदा आपल्या जीभेवर, दातांवर आणि हिरड्यांवर जमा झालेले जिवाणू लाळेसोबत मिळून आपले अन्न आणि प्रथिने नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. या प्रक्रियेमध्ये जो वायू बाहेर पडतो, त्यामुळे आपल्या श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. या दुर्गंधीला हॅलिटोसिस असे म्हणतात. दुसरे कारण म्हणजे, कोरड्या तोंडामुळे, लाळेचा प्रवाह हा अधिक प्रभावित होतो. लाळेच्या कमतरतेमुळे आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिआ तयार होतात. जे सतत सल्फर कंपाऊंड्स सोडतात आणि यामुळे श्वासातून दुर्गंधी देखील येते. जर तोंडाची ही दुर्गंधी वाढत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते.
यासाठी खालील टिप्स निश्चितच उपयोगी ठरू शकतात
आयुर्वेदिक माउथवॉश
या समस्येवर प्रथम क्रमांकाचा उपाय म्हणजे ‘कुमार भरण रास’ हा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केलेला नैसर्गिक माउथवॉश आहे. हा माउथवॉश अश्वगंधा, मुळेठी, आले, पिपळी, आमलकी, गुळाची, तुळशी यांचे मिश्रण करून बनवला जातो. हा माउथवॉश तुम्ही आठवडाभर साठवून ठेवू शकता. हवाबंद डब्यात ठेवून दिवसातून २ ते ३ वेळा वापरता येते.
लवंग आणि विलायची
श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग आणि विलायची एक काढा घ्यावा. आले, लवंग, वेलची आणि आले २ ग्लास पाण्यात मिसळा. जेव्हा पाणी उकळते आणि प्रमाण निम्मे राहते तेव्हा पाणी गाळून ग्लासमध्ये ठेवा. पोटदुखी, तोंडाची दुर्गंधी इत्यादी समस्यांवर लवंग आणि विलचीचा काढा फायदेशीर मानले जाते.
त्रिफळाचे पाणी
त्रिफळा पाणी आणि आवळा, हरड आणि विभिताकी यांनी श्वासाची दुर्गंधी दूर होउ शकते. या तिन्ही औषधी वनस्पतींच्या मिश्रणापासून बनवलेल्या पदार्थाला त्रिफळा म्हणतात. त्रिफळामध्ये व्हिटॅमिन सी, फ्रक्टोज आणि लिनोलिक अॅसिड असते. त्रिफळा चूर्ण करून गरम पाण्यात उकळा. हे मिश्रण गाळून बाटलीत भरून ठेवा. हे नैसर्गिक माउथवॉश म्हणून काम करेल आणि श्वासाची दुर्गंधी दूर होईल.
कॅल्शियमयुक्त दही खा
दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे निरोगी बॅक्टेरिया असतात जे तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया संतुलित करण्यास आणि श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.फ्लेवर्ड दह्याऐवजी साधं, कॅल्शियमयुक्त, फॅट्स नसलेलं दही खावं. पण तरीही जर हा त्रास सतत वाढत असेल तर एकदा डॉक्टरांना दाखवावे.
भरपूर पाणी प्या
रात्री आठ तासांच्या झोपेतून उठल्यानंतर तुमचं तोंड कोरडं होऊ शकते.जेव्हा तोंडात लाळ असते तेव्हा बॅक्टेरिया वाढत नाहीत.जर तोंड कोरडं असेल तर बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे श्वासाला दुर्गंधी येऊ शकते.पण,जेव्हा झोपतो तेव्हा लाळेचे प्रमाण कमी होते, म्हणूनच उठल्यावर लगेच तहान लागते. त्यामुळे नेहमी स्वतःला हायड्रेटेड ठेवावे आणि भरपूर पाणी प्यायला हवे.
उग्र वास असलेले पदार्थ टाळावेत
जर तुम्हाला संध्याकाळी कांदा आणि लसूण खायला आवडत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडातून दुर्गंधी येण्यास तेच कारण ठरतं. त्यामुळे रात्री नेहमी संतुलित आहार घ्यायला हवा, ज्यामुळे शरीराचं एकूणच आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल. नेहमी असे पदार्थ खावे जे प्लॉक बिल्ड अप काढून टाकतात आणि बॅक्टेरियाशीदेखील लढतात.
रोज संत्री खा
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने दात पांढरे होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सी हे लाळेचं प्रमाण वाढवण्यास आणि श्वासाची दुर्गंधी रोखण्यास मदत करतं. त्यामुळे रोज संत्री खावीत.
तोंडी दिनचर्या चांगली ठेवा
कधीकधी तोंडाच्या स्वच्छतेकडे योग्य लक्ष न दिल्याने सकाळी दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत तोंडाची दुर्गंधी रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दातांची नियमित स्वच्छता राखणं. तोंडातून अन्नाचे कण काढण्यासाठी, दातांमध्ये फ्लश करावं आणि किमान दोन मिनिटं दात घासावेत. हळूवारपणे हिरड्या, जीभ आणि अगदी तुमच्या गालाच्या आतील बाजूस ब्रश करावेत कारण तिथेही बॅक्टेरिया असू शकतात. नेहमी फ्लोराईड टूथपेस्ट आणि अँटिबॅक्टेरियल माउथवॉश वापरावा.
डॉक्टरांकडे कधी जायचे ?
तिखट वास येणाऱ्या कांदा, लसूण यांसारख्या गोष्टींचे आपण जेव्हा सेवन करतो तेव्हा काही काळ तोंडाला दुर्गंधी येते.जी काही काळानंतर स्वतःहून निघून जाते.परंतु,जर तुमच्या तोंडातून सतत दुर्गंधी येत असेल आणि ती बरी होत नसेल,तर समजून घ्या की हा कोणत्यातरी गंभीर समस्येचा परिणाम देखील असू शकतो.त्यामुळे, हीच वेळ असते,जेव्हा तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज असते.
(टीप : लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.त्यांचा प्रयत्न करण्यापूर्वी,कृपया तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)












































































