Last Updated on 18 Aug 2025 8:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
मुंबई | राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रात्रौ ११.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटर तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि. १९ ऑगस्ट २०२५ सकाळी ८.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रात्रौ ८.३० २० पर्यंत ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर; संततधार पावासामुळे जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे राधानगरीसह वारणा, कुंभी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पारिणामी कृष्णेसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदिकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आली आहेत. सातही स्वयंचलित दरवाज्यातून १० हजार क्यूसेक आणि पायथा विद्युतगृहातून १५०० क्यूसेक असा एकूण ११ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार
मुंबईसह राज्यभरात सर्वदूर मुसळधर पावसाने तडाखा दिला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला असून पश्चिम आणि मध्य दोन्ही मार्गावरील सेवा उशीराने धावत आहेत. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे ६ गावे पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात येलदरी धरण पूर्ण भरले असून पूर्णा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरमध्येही घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड आहे. राधानगरी धरणाचे ७ स्वयंचलित दरवाजे उघडले असून जिल्हा प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : कोयनेतून विसर्ग वाढला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून दि. १७ ते दि. २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्याचाबत सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. NDRF चे १ पथक बीड तालुका परळी कौडगाव येथे शोध व बचाव कार्यासाठी नियुक्त करण्याच्या अनुषंगाने रवाना करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे १ पथक नांदेड तालुका मुखेड हळणी गाव येथे नियुक्त केले असून त्या परिसरात कार्यरत आहे.
IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. तसेच SACHET platform चा वापर करून हवामानाचे अलर्ट नागरिकांपर्यंत SMS /NOTIFICATION च्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या रोजी सुटी
हवामान खात्याने उद्या मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात शाळांना सुटी जाहीर
ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि.१८ ऑगस्टआणि दि. १९ ऑगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
उद्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी
उद्या 19 ऑगस्ट रोजीही भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व माध्यमांच्या दोन्ही सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट
रेड अलर्ट
ठाणे, मुंबई, रायगड, रत्तागिरी, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट,
ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अमरावती,
येलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशीव, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ











































































