Last Updated on 10 Oct 2022 10:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । देशात असे एक गाव आहे जे आशियातील सर्वात श्रीमंत गाव मानले जाते.या गावात तुम्हाला शोधूनही कोणी गरीब सापडणार नाही. इथे राहणारा प्रत्येकजण करोडपती आहे.
2018 ची ही गोष्ट आहे.झोपेतून जेव्हा सगळा देश जागा झाला आणि एक बातमी कानी पडली तेव्हा एकच आश्चर्य देशभरातील लोकांच्या चेहऱ्यावर दिसलं.प्रत्येक न्युज चॅनेल आणि बातम्यांच्या स्रोतांवर एकाच गावाचं नाव होतं – बोमजा.अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात असलेल्या बोमजा नावाच्या गावात प्रत्येकजण करोडपती आहे.
खरे तर काही वर्षांपूर्वीपर्यंत बोमजा गावातील लोक सामान्य गावकऱ्यांसारखे होते,परंतु सरकारने एका रात्रीत हे गाव समृद्ध केले.कारण या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने संपादित केल्या होत्या.बोमजा गावातील जमीन संपादित करून शासनाने ग्रामस्थांना 40 कोटी 80 लाख 38 हजार 400 रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले.त्यामुळे या गावातील प्रत्येक व्यक्ती करोडपती झाला.
गावात राहतात केवळ 31 कुटुंबे
अरुणाचल प्रदेशच्या या गावात फक्त 31 कुटुंबे राहतात.अशा परिस्थितीत शासनाकडून मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेने या गावातील लोकांना करोडपतीचा दर्जा दिला.गावातील एकूण 200.056 एकर जमिनीच्या मोबदल्यात 31 कुटुंबांपैकी 29 कुटुंबांना शासनाने 1,09,03,813.37 रुपयांची भरपाई दिली त्याचवेळी उर्वरित 2 कुटुंबांपैकी एका कुटुंबाला 2,44,97,886.79 रुपये आणि दुसऱ्या कुटुंबाला 6,73,29,925.48 रुपये देण्यात आले.
यासाठी केली गावातील जमीन संपादित
बोमजा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून सरकारने गावकऱ्यांना श्रीमंत केले.आता या जमिनीवर भारतीय लष्करातील सैनिकांसाठी घरे बांधण्यात आली.त्यानंतर येथे लष्कराची तुकडीही स्थापन करण्यात आली.त्यामुळे तवांग परिसरातील सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. तवांग हे भारतातील सर्वात संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे.चीनची या क्षेत्रात नेहमीच वाकडी नजर असते.








































































