Last Updated on 02 Feb 2022 1:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सूर्यनमस्कार
माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिन
या निमित्ताने मला आज कठोपनिषादातील एक श्लोक आठवला,
आत्मानं रथिनं विद्धि शरीरंरथमेव तु।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मन: प्रग्रहमेवच॥
इन्द्रियाणि हयानाहूर्वियांस्तेषु गोचरान्।
आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहूर्मनीषिण: ॥
याचा अर्थ असा कि, मानवी जीवनाचा प्रवास करण्याकरिता शरीररूपी रथ असून’,आत्मा हा रथाचा मालक आहे. रथ चालवण्याकरिता बुद्धी ही सारथी आहे, व तिच्या हातात मनरूपी लगाम आहेत. या रथाला पंच ज्ञानेंद्रिय रुपी घोडे जोडलेले आहेत. हे घोडे त्यांच्या त्यांच्या विषयांकडे धावत असतात. अशा या रथाचा मालक आत्मा, इंद्रिय, मन व बुद्धीच्या आधारावर जीवनाचा भोग घेत असतो. जीवनाचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करीत असतो.
अर्थातच या साठी जातीवंत घोडे ताब्यात ठेवण्यासाठी सारथी कुशल असावा लागतो, अन्यथा घोडे त्याला आवरत नाहीत व अपघाताचे भय वाटू लागते.त्या इंद्रियांवर मनाचे नियंत्रण ठेवण्याकरता चतुर सारथ्याप्रमाणे विवेकी आणि विचारी बुद्धी असावी लागते .मन चंचलअसेल तर इंद्रिय त्यांच्या स्वभावाप्रमाणे विषयांकडे धाव घेतील व मग अपघात ,विनाश व दु:ख याला सामोरे जावे लागते.
हे जर थांबवायची असेल तर, आपल्या भारतीय संस्कृतीत काही योगासने आणि प्राणायामादि क्रिया सांगितलेल्या आहेत. त्यातील काही क्रिया सातत्याने जर केल्या तर शरीर व मनोनियणत्रणांसाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणून,आज त्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा एका क्रियेविषयी शास्त्रशुध्द माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ती क्रिया म्हणजे *सूर्यनमस्कार* होय.
सूर्यनमस्काराची सुरवात उभे राहून,म्हणजेच दंड स्थितीतून होते.
सूर्यदेवता ही दृश्य स्वरूपातील एकमेव अशी उपास्य देवता असून तील स्मरुन बीजमंत्रासहीत सुर्य मंत्र म्हणत,पूर्वाभिमुख सूर्यनमस्कार घालण्याची प्रथा आहे,म्हणून या क्रियेला सूर्यनमस्कार असे म्हटले जाते.
सूर्यनमस्कारात योगासनांचा अभ्यास,प्राणायामाची साधना,सूर्य नारायणाची उपासना व मंत्राचे सामर्थ्य म्हणून याला सर्वांग सुंदर आणि परिपूर्ण व्यायाम असे म्हटले आहे,
म्हणून तर सूर्यनमस्काराला शारीरिक ,मानसिक त्याचबरोबर आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होताना दिसते.
सूर्यनमस्कार घालत असताना,दहा अंक व बारा अंकाचे सूर्यनमस्कार अशा वेगवेगळ्याळ्या पद्धती जरी असल्या तरी ,यातील दहा अंकातील औंधकर पध्दती अधिक योग्य व सर्वश्रेष्ठ आणि शास्त्रीय पद्धती मानली जाते.
औंध संस्थानचे महाराज कै.श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, यांनी रूढ केलेली पध्दती म्हणजेच औंधकर पद्धती होय.
सर्व शालेय पातळीवरील सर्व स्पर्धांकरिताही हीच पद्धत अधिकृत मानली जाते.
या पद्धतीमध्ये दहा अंकामध्ये सूर्यनमस्कार घातले जातात.
म्हणून ही पद्धत आज आपण समजून घेणार आहोत .
औंधकर पध्दतीमध्ये दहा अंकात दहा अवस्थेमधून सूर्यनमस्कार घातले जातात.
त्यातील अवस्था क्रमांक एक, दोन व तीन त्याच अवस्था पुन्हा उलट क्रमाने दहा, नऊ ,आठ, एकच आहेत.म्हणजेच उरलेल्या सहा अवस्था म्हणजेच सहा असणे होय.
दहा अंकात,सूर्यनमस्कार घालत असताना एक आसनांची साखळी तयार होते,ती साखळी म्हणजे निरनिराळे योगासनाची साखळी होय.
एकला श्वास घेत नमस्कार स्थिती, दोनला श्वास सोडत जानुभालासन ,तीनला अवस्था श्वास घेत अर्ध भुजंगासन,चारला श्वास रोखलेल्या स्थितीत हस्तपादासन ,पाचला श्वास सोडत अष्टांगासन, सहाला श्वास घेत भुजंगासन ,सातला श्वास रोखलेल्या स्थितीत जानुशिरासन,आठला श्वास रोखलेले स्थितीत अर्धभुजंगासन, नऊला श्वास सोडत परत जानू भालासन.दहाला श्वास घेत परत नमस्कार स्थिती .अशी सूर्यनमस्कार घालत असताना योगासनातील सहा आसनांची एक साखळी तयार होते. त्यामुळे भारतात नव्हे तर संपूर्ण जगात आरोग्याच्या दृष्टीने सूर्यनमस्काराला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे . म्हणूनच सूर्यनमस्कारातील आसन आणि व्यायामाचे तंत्र अंगीकारण्याचा प्रयत्न अनेकजन करताना दिसतात.
सूर्यनमस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यनमस्काराचा उल्लेख योगशास्त्राच्या पातंजल योगदर्शन, हठ प्रदीपिका ‘घेरंड संहिता इत्यादी मान्यताप्राप्त जुन्या महत्त्वाच्या ग्रंथात कुठेच सापडत नसला तरी,त्यामध्ये असणार्या आसनांचा उल्लेख मात्र योगशास्त्राच्या ग्रंथातून पाहण्यात येतो.
सूर्यनमस्कार घालत असताना जलदगतीने घातले तर व्यायामाचे आणि संथ आणि सावकाश गतिने घातले तर पतंजलीने सांगितलेल्या पातंजल योगसूत्रात अध्याय २ सुत्र ४६ नुसार “स्थिरसुखमासनम्”या योगशास्त्राच्या व्याख्येनुसार योगासनांचे फायदे मिळून शारीरिक मानसिक फायद्याचा लाभ घेऊ शकतो.
म्हणून तर सूर्यनमस्काराला वरच्या दर्जाचे स्थान प्राप्त झाले आहे.त्यामुळे सूर्यनमस्काराचे आकर्षण दिवसेंदिवस युवा ,वृद्ध ,अतिवृद्ध तरुण-तरूणीमध्ये निर्माण होताना दिसते.
सूर्यनमस्कारामध्ये सूर्याची बारा नावे बीजमंत्रासहित घेत,प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार १,१२,५१,१०८ आणि यापेक्षा ही जादा सूर्यनमस्कार घातले जातात.
सूर्यनमस्कारात फायद्याच्या दृष्टीने विचार करता,
शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा विकास होऊन,संकटांना तोंड देण्यासाठी मन खंबीर बनण्यास मदत होते.
संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास होऊन.ज्ञान तंतूंची केंद्रे संवेदनक्षम बनतात.स्वभावात बदल होऊन, बुद्धीची वाढ होते.
वजन कमी होऊन शरीर हलके होते.
पतंजलींनी सांगितलेल्या व्याख्येनुसार आसन म्हणून याचा अभ्यास केला तर थकवा न येता उत्साह टिकून राहतो.कार्यक्षमता वाढून प्राण शक्तीचा संचय होतो .
रोगप्रतिकारक क्षमता वाढते .
नाडी शुद्धि व रक्ताभिसरण क्रिया सुधारते.शरीर लवचिक बनून चपळ होते.रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने हृदय, मेंदू, फुफ्फुसे, यांची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब नियंत्रणात येतो.
ऑक्सिजन वाढतो ,शरीरात ऊर्जा वाढते. तसेच शरीरातील विषारी घटकांचा निचरा होण्यास मदत होते.
स्नायू आणि हाडे बळकट बनतात. कॅल्शिअमची कमतरता पूर्ण केली जाते. कंबर आणि पाठीचा मणका लवचिक बनतो.
सूर्यनमस्कार हा वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा व्यायाम प्रकार आहे.
पचनक्रिया सुधारते.
मनाची एकाग्रता वाढल्याने जीवनात सुख,शांती समाधान समाधान प्राप्त होते.
संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास होतो.
असे अनेक शारीरिक मानसिक आध्यात्मिक फायदे होताना दिसतात.
सूर्य नमस्कार मंत्र
ॐ र्हाम् मित्राय नमः
ॐ र्हीम् रवये नम:
ॐ र्हुम् सूर्याय नमः
ॐ र्हैू्म् भानवे नमः
ॐ र्हाैम् खगाय नम:
ॐ र्ह:पुष्णे नमः
ॐ र्हाम हिरण्यगर्भाय नमः
ॐ र्हीम् मरिचये नमः
ॐ र्हूम आदित्याय नमः
ॐ र्हैुम सवित्रे नमः
ॐ र्हाैम अकार्य नम:
ॐ र्ह:भास्कराय नमः
ॐ श्री सावित्रे सूर्यनारायणाय नमः










पूर्णमंत्र
ॐ र्हाम् र्हीम र्हुम् र्हैम र्हाै र्ह:
मित्र-रवी -सूर्य -भानू- खग- पूषन- हिरण्यगर्भ -मरिचेय -आदित्य- आदित्य सवित्रृ-आर्क -भास्करेभ्यो नमो नमः
दक्षता आणि घ्यावयाची काळजी
सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम आणि आसन म्हणून जरी छान असले तरी काही लोकांना सूर्यनमस्कार मात्र वर्ज्य आहेत.
उदा.मेंदूचे किंवा मज्जासंस्थेच्या विकार, उच्च रक्तदाब ,हृदयविकार अशा रुग्णांनी सूर्यनमस्कार घालू नयेत.
त्याच बरोबर दंडाचे स्नायू कमजोर असणे ,मान व पाठ मणक्यातिला अंतर वाढलेले असल्यास ,नुकतीच पोटाची शल्यकर्म झाली असल्यास योगतज्ज्ञ मार्गदर्शनाच्या
परवानगीशिवाय करु नयेत..
कारण योगशास्त्रात *हठ प्रदीपिका* ग्रंथात श्लोक सोळा मध्ये म्हटले आहे,
प्राणायामादीयुक्तेन सर्व रोगक्षयो भवेत् ।
अयुक्ताभ्यासयोगेन सर्वरोगसमुद् भव:॥॥१६॥
योग्य प्रकारे केलेल्या प्राणायामामुळे सर्व रोग नाहीसे होतात पण अयोग्य प्रकारच्या अभ्यासामुळे सर्व रोग उत्पन्न होतात.
म्हणून गुरूपदिष्ट मार्गेण. गुरूच्या अर्थात सूर्यनमस्कार योग तज्ञाकडे शिकून मगच घालणे योग्य होईल.
जागतिक सूर्य नमस्कार दिनाच्या निमित्तानं एक सांगावेशे वाटते’,
योग शिका योग शिकवा ।
योग जागा योग अनुभवा।
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
(ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.













































































