Last Updated on 28 Sep 2022 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 15 महाविद्यालयामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत शिबिरामध्ये जवळपास 4 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
जात पडताळणी शिबीर दि. 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत घेण्याचे नियोजित असल्याची माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य खुशाल गायकवाड यांनी दिली.
या शिबीरामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी म्हणजे काय, जात पताळणीकरीता कोणकोणती कागदपत्रे लागतात, जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने झालेली असल्याने ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा, अर्ज केंव्हा करावा, ऑनलाईन अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, अर्ज समितीकडे विहीत मुदतीत कसा व कधी जमा करावा, कागदपत्रासंबंधी असलेल्या अडचणी याबाबत सविस्तर दृकश्राव्य माध्यमाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज इस्लामपूर, न्यू इंग्लिश स्कूल शिराळा, सैनिक स्कूल तासगाव, आनंदसागर पब्लिक स्कूल तासगाव, शांतीनिकेतन ज्युनिअर कॉलेज सांगली, पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ, महंकाली विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज कवठेमहांकाळ, एस.एम हायस्कूल व ज्यनिअर कॉलेज कवठेमहांकाळ, बाळासाहेब बापू गुरव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कवठेमहांकाळ, श्रीपतराव कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कडेगाव, अँग्लो उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय सांगली या महाविद्यालयाच्या ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.












































































