Last Updated on 21 Nov 2025 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने आज (दि. २१ नोव्हेंबर) मिरज क्षेत्रीय कार्यालय क्र. ४ अंतर्गत लक्ष्मी मार्केट परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करून संपूर्ण परिसर मोकळा केला. गर्दीची बाजारपेठ, प्रमुख संपर्कमार्ग आणि पादचारी मार्ग अडथळेमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेली ही मोहीम मनपाच्या अलीकडील काळातील सर्वात व्यापक कारवाईंपैकी एक ठरली.
ही कारवाई महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच उपायुक्त सौ. स्मृती पाटील आणि सौ. अश्विनी पाटील यांनी संयुक्त नेतृत्व करत मोठ्या पथकासह सकाळपासून कारवाई सुरू केली. लक्ष्मी मार्केट परिसरातील अनधिकृत व्यापारी विस्तार, तात्पुरत्या छपऱ्या, कट्टे, गाळे, बोर्ड आणि इतर बांधकामांच्या स्वरूपातील ४० हून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली.

बाजारपेठेतील कापड दुकाने, बांगडी विक्रेते, तात्पुरत्या मांडण्या, अनधिकृत जाहिरात फलक, छपऱ्या व व्यावसायिक वापरासाठी वाढवलेले कट्टे यामुळे परिसरात वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण होत होती. मनपाच्या पथकाने ही सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून बाजारपेठ पुन्हा मोकळी, सुरक्षित आणि व्यवस्थित केली. तसेच लोखंडी बॅरिगेट्स आणि दोन व्यावसायिक खोकेही उचलण्यात आले.
या कारवाईत मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि मोठ्या संख्येने अतिक्रमण पथक कर्मचारी सहभागी झाले. संपूर्ण मोहीम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील रस्ते, पादचारी मार्ग आणि बाजारपेठा नागरिकांच्या वापरासाठी असून त्यावरील कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला. अतिक्रमणमुक्त शहराच्या दिशेने मनपा सातत्याने आणि तीव्र गतीने कारवाया करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेमुळे लक्ष्मी मार्केट परिसरातील वाहतुकीतील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता आणि मोकळा मार्ग निर्माण झाला आहे. व्यावसायिक शिस्तीत वाढ होऊन बाजारपेठेला स्वच्छ, सुरक्षित आणि नियमनबद्ध स्वरूप लाभले आहे.
शंभर फुटी परिसरात मनपाची ‘अतिक्रमण एक्सप्रेस’ सलग चौथ्या दिवशीही धडाक्यात!

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने ‘स्वच्छ रस्ते – सुरक्षित शहर’ या विशेष अभियानाला वेग देत आज (दि. २१ नोव्हेंबर) शंभर फुटी रोड परिसरात सलग चौथ्या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शिस्तबद्ध आणि कोणताही पूर्वसंधी न देता राबविण्यात आली. रस्त्यालगत, पादचारी मार्ग आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उभ्या राहिलेल्या अडथळ्यांमुळे नागरिकांना मार्गक्रमणात मोठी अडचण येत होती. आजच्या कारवाईनंतर हा मार्ग पुन्हा स्वच्छ, सुरक्षित आणि पूर्णतः अडथळामुक्त झाला.
सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) नागार्जुन मद्रासी यांच्या नेतृत्वाखाली सहा तासांहून अधिक वेळ चाललेल्या या विशेष मोहिमेत विविध प्रकारची अतिक्रमणे हटविण्यात आली. बोर्याक्ट/बॅरिकेडच्या दोन आडव्या बांधण्या, तीन शेड्स, चार टी-बोर्ड, दोन मोठे बोर्ड व होर्डिंग तसेच एक अनधिकृत कट्टा असे एकूण अनेक अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात आले. या अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी आडवी-तिडवी होत असून पादचाऱ्यांना व वाहनचालकांना सतत धोक्याची परिस्थिती निर्माण होत होती. तातडीच्या कारवाईनंतर पादचारी मार्ग पूर्णतः मोकळा झाला असून वाहतुकीची सुसूत्रता लक्षणीयरीत्या वाढल्याचे प्रशासनाने सांगितले.
अतिक्रमण पथकाने या मोहिमेत उत्तम समन्वय आणि दक्षता दाखवली. सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी यांच्या नेतृत्वाखाली वाहनचालक विक्रम घाडगे, तसेच कर्मचारी समीर अत्तार, उल्हास आवळे, संदीप वायदंडे, श्रीधर कांबळे, विनायक माने, विष्णू कोळी व अतुल शिकलगार यांनी संघर्षमुक्त आणि शांततेत कारवाई पार पाडली. अचूक आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे ‘अतिक्रमण एक्सप्रेस’ची मोहीम सलग चौथ्या दिवशीही प्रभावी ठरली.
मनपा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छ व सुरक्षित शहर निर्माण करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार आहेत.
“शहरातील रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ वापरासाठी आहेत. कोणतेही अतिक्रमण लहान असो वा मोठेते शहराच्या विकासाला आडकाठी ठरते. मनपा प्रशासन सलग आणि नियोजनबद्ध कारवाईद्वारे शहराचे रूपांतर करत आहे. नागरिकांनी सहकार्य करून अतिक्रमणमुक्त, स्वच्छ व शिस्तबद्ध शहरनिर्मितीस हातभार लावावा.”
सत्यम गांधी (भा.प्र.से.),
महापालिका आयुक्त












































































