Last Updated on 09 Sep 2023 3:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जालना । सरकारने दिलेल्या नव्या जीआरमध्ये काहीच दुरुस्ती झाली नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख या जीआरमध्ये नाही.त्यामुळे सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या बारा दिवसांपासून अंतरवाली जराठीमध्ये उपोषणावर बसले आहेत.काल जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.त्यानंतर सरकारचे पत्र घेवून अर्जुन खोतकर त्यांच्या भेटीला आले होते.या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपोषणावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे.
सरकारने दिलेला एक लिफाफा घेऊन अर्जुन खोतकर आले होते.हा लिफाफा खोतकर यांनी फोडला आणि त्यातील नवा जीआर जरांगे पाटील यांना दिला.सरकारने दिलेल्या नव्या जीआरमध्ये काहीच दुरुस्ती झाली नाही.मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख या जीआरमध्ये नाही.त्यामुळे सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका घेतली.
2004 मध्ये काढलेल्या जीआरचा काहीच फायदा झाला नाही.या जीआरमध्ये दुरुस्ती करून मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी होती.तसेच आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी असतानाही प्रक्रिया सुरू नाही,केवळ गुन्हे मागे घेतो म्हणाले,असे म्हणत लाठीचार्ज करणाऱ्यांना बडतर्फ का केले नाही? असा सवाल जरांगे पाटील यावेळी केला.आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत.आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.












































































