Last Updated on 17 Apr 2025 9:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रस्तावना : समाधानाचं घर
घर म्हणजे काय? चार भिंती आणि एक छप्पर? की घर म्हणजे माणसं, भावना आणि नात्यांची ऊब?
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जगात “मोठं” मिळवण्याची हाव इतकी वाढली आहे, की “मिळालेलं” किती मौल्यवान आहे हे विसरून गेलो आहोत. आपण सतत इतरांच्या घरी डोकावत राहतो. त्यांच्या भिंती रंगवलेल्या, फर्निचर महागडं, लाईफस्टाईल झगमगती. आणि मग आपल्याला वाटतं, आपलं घर लहान आहे, आपलं आयुष्य अधूरं आहे.
पण खरं पाहिलं, तर घराचं मोल त्या घरातल्या समाधानावर असतं. प्रेम, समजूत, हास्य, आपुलकी, छोट्या गोष्टींमधला आनंद ह्या गोष्टी जिथे आहेत, तिथेच खरं घर वसतं.
“समाधानाचं घर” हे सदर त्या छोट्या, पण मोलाच्या क्षणांना, माणसांना, अनुभवांना उजाळा देईल.
हे लेखन तुमच्या मनाच्या खोल कप्प्यात झिरपलेल्या आठवणी जागवेल, आणि आठवण करून देईल की…
“सुख म्हणजे काय, तर जिथे मन भरून येतं तेच आपलं समाधानाचं घर!”
या सदरात दरवेळी आपण भेटू कधी एखाद्या झोपडीत राहणाऱ्या पण हसतमुख आजीला, कधी चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या समाधानशील तरुणाला, कधी नात्यांमध्ये जपलेली माणुसकी, तर कधी एखाद्या गावातलं जिवंतपण.
आपलं ‘घर’ शोधूया… ते घर मनात असेल, तर जगात कुठेही समाधान सापडेल.
मोठं घर नव्हे, समाधानाचं घर हवं
घर किती मोठं आहे, त्यात किती खोल्या आहेत, किती आधुनिक सुविधा आहेत. हे सगळं महत्त्वाचं वाटत असलं, तरी माणसाच्या आयुष्यातील खरे सुख यापलीकडे असते. आज अनेक कुटुंबांच्या अनुभवातून आणि जीवनदृष्टीतून एक विचार पुन्हा पुन्हा पुढे येतो आहे – “गरज नाही घर मोठंच असावं, जसं पण असावं, सुखी आणि समाधानी असावं.”
या साध्या पण प्रभावी विचाराने अनेकांना अंतर्मुख केलं आहे. आयुष्यात भौतिक उन्नतीच्या मागे लागताना माणूस आपल्याला मिळालेलं समाधान, प्रेम, शांतता आणि माणुसकी हरवत चालला आहे. मोठी घरे, गाड्या, मानमरातब मिळवले तरी, घरात समाधान नसेल, तर ते रिकामंच वाटतं, असा अनुभव अनेकांनी शेअर केला आहे.
ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबं छोट्याशा घरात राहतात. त्यांच्या घरात एसी नसतो, महागडी फर्निचर नसतात, पण एकमेकांची साथ, हसणं, खेळणं, एकत्र जेवणं – हे सगळं असतं. हेच तर खरं सुख आहे, असं स्थानिक नागरिकही मान्य करतात.
समाधान हा शब्द खूप साधा असला, तरी त्याचा अर्थ फार खोल आहे. जे आहे त्यात आनंद मानणं, अति अपेक्षांचं ओझं न बाळगणं, आणि घर म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर भावना, आपुलकी आणि आधार आहे हे लक्षात घेतलं तरच समाज खर्या अर्थाने पुढे जाईल.
मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक विचारवंत यांच्या मतेही, आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना मानसिक ताण, नैराश्य, असंतोष यांचा सामना करावा लागतो. याला कारण म्हणजे सतत काहीतरी ‘मोठं’ मिळवण्याची हाव. त्याऐवजी घरात शांतता, समजूत, प्रेम असेल तर छोटंसं घरही ‘स्वर्ग’ वाटू शकतं.
हा विचार केवळ भावना नव्हे, तर सामाजिक वास्तवही आहे. शहरात मोठ्या टॉवरमध्ये राहणारी माणसंही अनेकदा एकटी पडलेली दिसतात, तर गावात खोपटात राहणारे कुटुंब एकमेकांच्या सहवासात समाधानी जीवन जगताना दिसतात.
म्हणूनच आजच्या काळात गरज आहे ती साधेपणातलं सौंदर्य, आणि समाधानातलं खऱ्या सुखाचं भान ओळखण्याची.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more













































































