Last Updated on 10 Feb 2024 9:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
सांगली । कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून त्या ध्येयाचा सतत पाठपुरावा करावा. स्मार्ट लर्निंग, कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, आणि अद्ययावत ज्ञान सतत आत्मसात करावे ;असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहामध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील होते.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रतीक पाटील म्हणाले,आता चाट जीपीटी सारखी नवी प्रणाली आणि तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र असे बदल ज्ञानाच्या क्षेत्रात होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्मार्ट लर्निंग कडे लक्ष द्यावे.कॉलेज जीवनामध्येच आपली ध्येय ठरवून त्यासाठी सतत प्रात्यक्षिक ज्ञानाद्वारे,कृतीद्वारे अनुभवातून शिकावे.म्हणजे ध्येयाची वाटचाल सुकर होईल.यावेळी प्रतीक पाटील यांनी महाविद्यालयाच्या विविध स्तरावरील उल्लेखनीय यशाबद्दल प्रशंसा केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले, युवा वर्गाने फक्त नोकऱ्यांपेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान आणि कौशल्य विकसित करून स्वयंरोजगाराच्या दिशा देखील ठरवाव्यात.आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या वयामध्ये शिक्षणाचा किंवा कष्टाचा घेतलेला ध्यास करिअरचा पाया भक्कम करत असतो.
प्रारंभी आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव म्हणाले, वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या विस्तारामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने कालानुरूप बदल करून व्यवसाय शिक्षणाच्या नव्या शाखा सुरू केल्या आहेत. विद्यार्थी देखील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विद्यापीठ, राज्यस्तरापर्यंत चमकत आहेत.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रतीक पाटील यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. अशोक शिंदे यांनी करून दिला.याप्रसंगी प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर हे उपस्थित होते.या वर्षीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. बी पी पाटील यांनी अहवाल वाचन केले.नॅक कॉर्डिनेटर डॉ. मंगल लोंढे,प्रा.युवराज वाघमारे,प्रा. डॉ. एच. ए. नारायणकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल चांदेकर,प्रा. डॉ. गोरखनाथ किर्दत,प्रा. एस. एस. चव्हाण,प्रा. बी. के. पाटील आदींनी शैक्षणिक,क्रीडा सांस्कृतिक,एनएसएस; अशा पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे संयोजन केले.प्रा. डॉ. सचिन हूदले यांनी आभार मानले.प्रा. गणेश स्वामी,प्रा. स्मिता डुबल यांनी सूत्रसंचालन केले.या समारंभात महाविद्यालयातील प्राविण्य प्राप्त शिक्षक तसेच विद्यार्थी यांचा यथोचित गौरव करण्यात आला.












































































