Last Updated on 05 Oct 2024 8:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाशीम । भाजपा देश एकसंध ठेवून राष्ट्राला पुढे नेण्याची धोरणं राबवते आहे. मात्र, देशाची ही अखंडता काँग्रेसला सोयीची नाही, म्हणूनच काँग्रेसला सगळ्या समाजाला एकमेकांशी लढवत ठेवते आहे, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. समाजात एकी राहू नये यासाठी काँग्रेस करत असलेले प्रयत्न हाणून पाडण्याचं आवाहन त्यांनी केलं.
वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं अनेक विकासकामांच लोकार्पण आणि पायाभरणी केल्यांनतर घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसला समाज दुभंगलेला हवा आहे, यासाठी ते शहरी नक्षलवादाला पाठबळ देत आहे, देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा विघातक शक्तींपासून आपल्याला सावध राहायचं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
बंजारा समाजाचं राष्ट्र निर्मितीत मोठं योगदान आहे , या समुदायानं स्वातंत्र्याच्या चळवळीतही मोठं योगदान आहे. मात्र बंजारा आणि इतर भटक्या समुदायांना काँग्रेसनं नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली. या समाजाला मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही. मात्र रालोआ सरकारनं या समाजांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्या विकासाची दारं खुली केली असं पंतप्रधान म्हणाले.
वेगवेगळ्या राज्यात खोटी आश्वासनं देऊन काँग्रेस सत्तेत आली आहे, मात्र महाराष्ट्रात महायुती सरकारनं विकासाला चालना दिली आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. नदीजोड प्रकल्प, सिंचन, वस्त्रोद्योग पार्क, असे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. या आधीही केंद्र सरकारनं सिंचनासह विविध योजनांसाठी निधी पाठवला, मात्र, महाविकास आघाडी सरकारनं जनतेसाठी त्याचा काहीही उपयोग केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
त्याआधी, सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधानांनी केला. ऑगस्ट ते नोव्हेंबर कालावधीतला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता यावेळी वितरित करण्यात आला. यामार्फत सुमारे ९ कोटी ४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये जमा झाले. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ताही मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. याद्वारे सुमारे २ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १ हजार ९२० कोटी खर्चाचे साडेसात हजारांहून अधिक प्रकल्पांचं राष्ट्रार्पण यावेळी झालं. यामध्ये प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, शीतगृह प्रकल्प, काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेल्या ९ हजार २०० एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. त्याशिवाय, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या स्वदेशी सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाचा पंतप्रधानांनी शुभारंभ केला. जनुकीय निवडीच्या सुविधेमुळे उच्च दर्जाच्या बैलाची कमी वयातच निवड करणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण १९ मेगावॅट क्षमतेच्या पाच सौर ऊर्जा पार्कचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं. यात सातारा, अकोला, संभाजी नगर, बुलडाणा, नांदेड सोलर पार्कचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान केला.












































































