Last Updated on 13 Apr 2022 6:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आधुनिक महाराष्ट्रामध्ये अस्पृश्यांसाठी शाळा, घरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करणे, सभांमध्ये अस्पृश्यता निवारणाची गरज प्रतिपादन करणे इ. माध्यमातून महात्मा जोतीराव फुल्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य सुरू केले होते. पु. ल. देशपांडेंच्या शब्दात सांगायचे तर गळ्यातल्या कवड्याच्या माळेशी इमान राखणारे कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी तर अस्पृश्याबरोबर सहभोजन, महार-वतनांना बंदी, अस्पृश्याना शिक्षणाच्या संधी, नोकरीत राखीव जागा, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास परवानगी, अस्पृश्यांच्या सभा, परिषदा, मेळावे यांना उपस्थिती असे बहुविध उपक्रम राबवले. आपल्या खाजगी सेवेत त्यांनी अस्पृश्याच्या नेमणुका केल्या. गंगाराम कांबळेच्या ‘सत्य-सुधारक’ हॉटेलात ते इतर सरदारांच्या बरोबर चहा पीत. दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही अशी त्यांची भूमिका होती. मार्च 1920 च्या माणगावच्या परिषदेत छ. शाहूंनी आंबेडकरांना अस्पृश्यांचा खरा पुढारी म्हणून गौरवले. विठ्ठल रामजी शिंदे आपल्या पत्नीसह अस्पृश्य वस्तीत राहून ‘डिप्रेस्ड क्लास मिशनच्या’ मदतीने आपले कार्य करीत होते.त्यांच्या बेळगावच्या परिषदेस महात्मा गांधी आले होते. जमलेल्या लोकांपैकी अस्पृश्य किती आहेत? त्यांनी हात वर करावा. असे गांधींनी सुचवताच एकही हात वर झाला नाही. अर्थात पुढे गांधींच्या हरिजन सेवक संघाच्या कार्यकारणीचा एकही सभासद अस्पृश्य नव्हता. थोडक्यात गांधी काय नि विठ्ठल रामजी शिंदे काय दोघेही सारख्याच खोल पाण्यात उभे होते. गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्य-जागृतीचा प्रयत्न केला होता. संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून शिवाशिव न पाळण्याचा उपदेश करीत होते. समतानंद अनंत हरी गद्रे, मामा वरेरकर, स्वातंत्र्य वीर सावरकर, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख असे अनेक सुधारक आंबेडकरांच्या आगे-मागे अस्पृश्यता निवारणासंदर्भात प्रयत्न करीत होते.
धनंजय कीरांनी म्हटल्याप्रमाणे इतर सुधारकांचे प्रयत्न व आंबेडकरांचे प्रयत्न यामध्ये दाईचे प्रेम व आईचे प्रेम असा फरक होता. दलितांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन त्यांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी आंबेडकरांनीच पार पाडली. म्हणून तर ते अस्पृश्य वर्गाचे प्रभावी नेते ठरले. कोणताही युग प्रवर्तक नेता आपल्या समाजाची दु:स्थिती समजून घेतो आणि नंतर जमेल त्या साधन-सामग्रीनिशी ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आंबेडकरांनी हे करीत असताना परंपरागत साधनांचाच वापर केला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे मते देश सुधारणेचा राजमार्ग म्हणजे लोकांस ज्ञान-संपन्न करणे.ही संपन्नता सिद्ध करण्याची मोठी साधने म्हणजे रचना व लेखणी होत. रचना म्हणजे शाळा, व्याख्याने तर लेखणी म्हणजे वृत्तपत्रे, मासिके, ग्रंथ. इतर नेत्यांप्रमाणेच आंबेडकरांनी हीच साधने समाज-सेवेसाठी वापरली. अस्पृश्यता- निवारण कार्य, घटना मसुदा समिती प्रमुख पद, राजकीय चळवळ, महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेशाची आंदोलने, ऐतिहासिक धर्मांतर शे.का.फेडरेशनची स्थापना, ग्रंथ-लेखन, पाक्षिकांचे संपादन आणि प्रत्यक्ष प्राध्यापकी या सर्वांमधून लोकशिक्षक बाबासाहेब आंबेडकर हेच रूप पुढे येते. त्यांच्या वैयक्तिक शिक्षण प्रक्रियेतच त्यांच्या भावी मोठेपणाची बीजे आहेत. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे आंबेडकरांचे शालेय शिक्षण दापोली, मुंबई, सातारा अशा विविध शाळांमधून झाले. मीरा-बाई या त्यांच्या आत्या भजने, अभंग, दोहे गात. हार्वर्डची इंग्रजी पुस्तके नि तर्खडकरांच्या भाषांतर पाठमाला यांच्या साह्याने वडिलांनी आंबेडकरांचा इंग्रजी विषय घोटून तयार केला. काही वेळा आपल्या मुलीचे दागिने गहाण ठेवून त्यांना पुस्तके विकत आणून दिली. 1907 साली आंबेडकरांना मॅट्रिकच्या परीक्षेत 750 पैकी 282 गुण मिळाले. त्या काळात अस्पृश्य मुलगा मॅट्रिक होतो ही अपूर्वाई होती. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांना बुद्ध-चरित्र भेट दिले. बडोदा संस्थांनाची मासिक 25 रु. शिष्यवृत्तीही मिळवून दिली. बी.ए. झाल्यानंतर अल्पावधीतच वडील वारल्यामुळे बडोदा-संस्थानातील लेफ्टनंटची नोकरी थांबवून त्याच संस्थानाच्या मदतीने ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. शिष्यवृत्तीच्या पैशातूनच ते घरी पैसे पाठवीत. रोज 18-18 तास अभ्यास करीत. अमिरिकेत पोटाला न खाता त्यांनी 2 हजारांवर ग्रंथ जमा केले. बडोदा दिवाणाच्या सूचनेवरून ते कायदा व अर्थशास्त्राचा अभ्यास मध्येच थांबवून इंग्लंडहुन परतले. पण यावेळची बडोद्याची लष्करी पदाची नोकरी त्यांना त्रासदायक ठरली. सवर्ण हिंदूंनी केलेल्या छळामुळे त्यांनी बडोदा सोडले व मुंबईत परतले मुंबईत सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम केले. पण इतर प्राध्यापक त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला हात लावू नये अशी दक्षता घेत. काटकसरी स्वभावाने केलेली बचत, स्नेही नवल कडून घेतलेले पाच हजार रुपये कर्ज, शाहूंची मदत यामुळे ते परत लंडनला गेले. ब्रिटीश म्युझियममध्ये सगळ्यात आधी वाचनालयात येवून सगळ्यात शेवटी बाहेर जाणारे व बचतीसाठी स्वतःची उपासमार करणारे आंबेडकर कुठल्याही विद्यार्थ्याला आदर्शभूतच ठरतील. लंडन विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) ही पदवी दिली. दुपारचे फराळातून वाटा देणारे सातारचे पेंडसे मास्तर, न मागता नव्या कपड्याचा जोड देणारे पार्शियनचे प्राध्यापक इराणी, संशोधनात स्वालंबन शिकवणारे डॉ. सेलिग्मन या सर्व गुरुजनांविषयी त्यांना आदर होता.
सेनापती बापटांच्या मते ज्ञानाची उपासना करणारे आंबेडकर हेच खरे ब्राह्मण होत. तस महात्मा गांधींना देखील वाटायचं की आंबेडकर हे अस्पृश्यतेसाठी चळवळ करणारे कुणीतरी ब्राह्मण गृहस्थ आहेत. लोकमान्य टिळकांना वाटायचं महात्मा गांधी हे कुणी तरी जैन गृहस्थ आहेत. अर्थात ब्रिटिश सरकारकडे या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती होती. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, सिडनेहॅम कॉलेज, बाटलीबॉय इन्स्टिट्यूट या ठिकाणी त्यांनी प्राध्यापकी केली. विद्यापीठ हे कारकून करण्याचे नव्हे तर ज्ञानाचे केंद्र असले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या मते शिक्षक आपल्या विषयात प्रविण पाहिजेत. विद्यालयाचा लौकिक शिक्षकांच्या कर्तृत्वावर आणि वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो.
न्या. रानडे यांच्याप्रमाणेच आंबेडकर अखंड वाचन करीत. वाचलेल्या ग्रंथाचा आकार, रंग, प्रकरणे त्यांच्या स्मरणात रहात. त्यांच्या राजगृह या निवासस्थानात त्यांनी चर्चिलप्रमाणेच पुस्तकासाठी स्वतंत्र कपाटे केली होती. बऱ्याच वेळा ते वाचनालयातच जेवण घेत. “ग्रंथाच्या संगतीत राहण्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग करीन” असं म्हणणाऱ्या सिसरोप्रमाणेच ग्रंथ-संग्रह त्यांना आपल्या कुडीतला प्राण वाटे. ग्रंथ हा त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छ्वास होता. “माझ्या ग्रंथावर बेलीफ जप्ती घेऊन आला तर त्यास मी यम सदनात पाठवीन” असे ते म्हणत. त्यांची खरी मनोभूमिका.
या दुर्बल जातीत मी जन्माला आलो नसतो तर राजकारणाच्या घृणास्पद खेळाला स्पर्श सुद्धा केला नसता. सर्व आयुष्य लेखन – वाचनात घालवल असतं” या त्यांच्या उदगारात स्पष्ट होते. ते सहा-सहा तास अखंड वाचन करीत. ‘बहिष्कृत भारत’ सुरू करण्यापूर्वी त्यांनी टिळक, आगरकर, चिपळूणकर यांच्या लेखन शैलीचा अभ्यास केला. माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास त्यांना आवडे.
आंधळ्या दलित जनतेच्या हातातील आपण काठी आहोत अस अभिमानानं सांगणारे आंबेडकर आपल्या समाजास राजकीय शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत होते. सामाजिक समतेवर आधारित समाजाची पुनर्घटना करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा, समाज समता संघ अशा संस्था स्थापन केल्या. स्वतंत्र मजूर पक्ष, शे.का.फेडरेशन इ. मार्फत अस्पृश्यांचे राजकीय संघटन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या समाजासमोर शिकवा, चेतवा, संघटित करा हा कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्यासाठी त्यांनी महाविद्यालये सुरू केली. पक्षाच्या कार्यकर्त्याना उच्च शिक्षण असावे याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यासाठी एक प्रशिक्षण केंद्र काही काळ (1 जुलै 1956 ते मार्च 1957) चालवले. बाटलीबॉय इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी असा विनोद सांगितला की एक आमदार बजेट येणार म्हटल्यावर सारखी चौकशी करायचे. बजेट आले, चर्चा झाली हा आमदार विचारतो, “आता बजेट साहेब केव्हा येणार?”
कुटुंबनियोजना संदर्भातही स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींचे अनुयायी आत्म-संयमन वगैरे मार्ग सुचवीत असता विधिमंडळामध्ये आंबेडकर वैद्यकीय शस्त्रक्रियेचा आणि या संदर्भातील शासकीय जबाबदारीचा उहापोह करीत होते. विधिमंडळाचे सदस्य म्हणून आंबेडकरांनी खोती पद्धतीपासून अनेक महत्वाचे सामाजिक प्रश्न हाताळले. मंदिर प्रवेशाची चळवळ, महाडचा सत्याग्रह, धर्मांतर या साऱ्याच गोष्टी त्यांनी दलितांच्या प्रबोधनासाठी योजल्या. महाडला अस्पृश्य स्त्रियांसमोर त्यांनी केलेले भाषण दलित स्त्रीला रूढी, परंपरेतून मुक्त करण्यासाठी आंतरिक कळकळीपोटी केलेले आवाहन आहे. स्वछता, टापटीप, व्यसनी नवऱ्यांना विरोध, मेलेल्या जनावरांचे मांस खाण्यास नकार द्या. दागिने घातलेत तर सोन्याचे घाला. अशा साध्या सध्या सुचनांतून अस्पृश्य स्त्रीची प्रतिमा उंचावण्याचा ते प्रयत्न करतात.
लोक-शिक्षकांची त्यांची भूमिका प्रामुख्याने जाणवते ती त्यांच्या व्यापक ग्रंथ-लेखनातून आणि पाक्षिकांतून. आंबेडकरांचे आर्थिक विचार इतके प्रभावी आहेत की आपल्या विद्यापीठांमध्ये एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा अभ्यास व्हायला हवा. ‘बुद्ध आणि त्याचा धर्म’ ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ ‘व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल्स’ ‘ द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ अशी काही ग्रंथांची नावे देखील त्यांचा विद्येच्या विविध क्षेत्रातील व्यासंग दर्शवतात. एकीत जय आणि बेकीत क्षय हे त्यांचे विचारसुत्र होते. समाजसेवकाचा आर्थिक कणा ताठ असला पाहिजे म्हणून ‘बहिष्कृत भारता’ वर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू नये म्हणून त्यांनी वकिलीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. ‘बहिष्कृत भारतातून’ त्यांनी स्वकीयांना सल्ला व टिकाकारांवर हल्ला सुरू ठेवला. ते एका शुक्रवारी ‘बहिष्कृत भारत’ तर दुसऱ्या शुक्रवारी ‘समता’ चा अंक प्रकाशीत करीत. टिळकांप्रमाणेच त्यांचे लिखाण युक्तिवाद प्रचुर होते. बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय? या आपल्या लेखात ते लिहितात, “या पत्राची संपादकी ही पैसा कमावण्याचा धंदा नसून लोकजागृती करता घेतलेली स्वयंशिक्षा आहे. हे कार्य एकट्याने होणार नाही. दस की लकडी एक एक का बोजा झाला तरच ते तडीस जाईल. नाहीतर मध्येच लोप पावेल” तसेच झाले. आर्थिक कुचुंबनेमुळे 1929 साली ‘समता’ नि ‘बहिष्कृत भारत’ बंद पडले. काही वेळा आंबेडकर एकटेच चोवीस रकाने मजकूर लिहीत. लोकहीतवादींची शतपत्रे त्यांनी पुर्नमुद्रित केली. ते ब्राहमण्य विरोधी होते ब्राह्मण विरोधी नव्हते. म्हणून तर महाडच्या सत्याग्रहावेळी ब्राह्मणाना चळवळीत भाग घेऊ देणार नसाल तर आपण तुम्हास पाठिंबा देऊ या सत्यशोधकांच्या मागणीस त्यांनी झिडकारले अस्पृश्यांचा स्वाभिमान जोपासण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत. ‘समता’ व ‘बहिष्कृत भारत’ बंद पडल्यावर ‘जनता’ हे देवराव नाईकांचे संपादकत्वाखाली पाक्षिक सुरू केले. लालित्यापेक्षा त्यांचा भर विचारांवर होता. विभूतीपूजा व अंधश्रद्धा सोडून बुद्धिप्रामाण्याचा ते आग्रह धरीत. शाहूंच्या मदतीने 1920 साली सुरू केलेल्या ‘मुकनायकाची’ केसरीने जाहिरात सुद्धा छापली नाही. पण टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत यांचा आंबेडकरांच्या चळवळीस पाठिंबा होता. मूकनायक, समता, बहिष्कृत भारत, जनता या पाक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी लोक-शिक्षणाचा आटोकाट प्रयत्न केला.
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
![]()









































































