Last Updated on 19 Jun 2022 11:17 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्याच्या अनेक भागात आजपासून (रविवार)मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.मुंबई,ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे.
काही दिवस पावसाने दडी मारली होती. आता पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असून कोकण विभागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांतही पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी भागांतही मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः दि. २०, २१ व २२ रोजी संपूर्ण कोकणासहित सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद,लातूर आणि नांदेड भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.सध्या कोकण विभागात हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, दोन दिवसांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे.मराठवाडा, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मान्सून देशात हळूहळू सर्वत्र दाखल होत आहे, मात्र अनुकूल वातावरण नसल्याने तो दमदार बरसत नाही.एकीकडे मान्सून पुढे सरकत आहे,मात्र पाठीमागे पाऊस होत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे.दरम्यान,नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम बंगालसह झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकत प्रगती केली आहे.आगामी तीन दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
काही दिवस पावसाने दडी मारली होती.आता पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे.सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाची गुजरातपर्यंत प्रगती झाली आहे.मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा ओलांडून मोसमी पाऊस विदर्भातील बहुतांश भागांत दाखल झाला.जवळपास 99 टक्के महाराष्ट्र मोसमी पावसाने व्यापला आहे. मात्र, म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.अरबी समुद्रातून सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास वाढत आहे.दोन दिवसांत त्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे.
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते.अखेर पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.दरम्यान,शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला मिळाला आहे.100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
सैटेलाइट इमेजेस














































































