Last Updated on 22 Apr 2024 10:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 258 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड 13, बारामती 38, धाराशीव (उस्मानाबाद) 31, लातूर 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 9, कोल्हापूर 23, हातकणंगले 27 अशी आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला उमेदवारी मागे घेण्याची मुदत आज संपली.या टप्प्यात राज्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
सांगली मतदारसंघात पाच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे संजय पाटील, महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ३१ उमेदवार राहिले आहेत.
सोलापूरमधे वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड, अपक्ष उमेदवार श्रीदेवी फुलारे, राष्ट्रवादीचे प्रमोद गायकवाड यांच्यासह अकरा जणांनी माघार घेतली आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.














































































