Last Updated on 02 Nov 2024 2:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बारामती । राज्याची सध्याची स्थिती गंभीर असून ती बदलण्यासाठी सत्ताबदलाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्याला पूर्वपदावर आणण्याची ताकद असणाऱ्यांना जनतेनं आपला कौल द्यावा आणि ती ताकद फक्त महाविकास आघाडीत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
गोविंद बाग इथं ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात परिवर्तन आणण्याचा आणि राज्याच्या नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याचा निर्धार आज पाडव्याच्या दिवशी करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचा, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतचा निष्कर्ष गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप पवार यांनी केला.
राज्यात जनहितासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांसाठीचा निधी सरकारनं गेल्या दोन-अडीच महिन्यांमध्ये दुसरीकडे वळवल्यानं लाभार्थ्यांच्या हातात काहीच पडलेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
‘निवडणुकीत पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर’
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरवले जात आहेत. हे पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. अशी माहिती एका अधिकाऱ्यानेच आपल्याला नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. अनेक जिल्ह्यातील अधिकारी हे आपल्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून आपल्याला समजले की सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना जे अर्थसहाय्य केले जात आहे, त्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. याबाबत आपण जाहीर पणे बोलणार होतो. मात्र ज्या अधिकाऱ्यांने मला ही माहिती दिली, त्याने आपल्याकडून कमिटमेंट घेतली होती. आपले नाव यात कुठेही यायला नको अशी त्यांची अपेक्षा होती. भविष्यात त्यांच्यावर कोणते संकट नको म्हणून त्यांनी कमिटमेंट घेतली असेही पवारांनी सांगितले.












































































