Last Updated on 20 Jul 2025 5:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
प्रत्येक कर्मचाऱ्यांस कडुलिंबाचे रोप देऊन त्याचे संगोपन व संवर्धन केले जाणार
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामबापू समूहातील प्रत्येक कर्मचाऱ्यांस कडुलिंबाचे एक रोप देऊन त्याचे संगोपन व संवर्धन केले जाणार आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना,कृषी पदवीधर संघ आणि लायन्स क्लबच्या वतीने हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला असून कृषी पदवीधरचे अध्यक्ष बी.डी.पवार यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना रोपे वाटप करण्यात आली. लायन्स क्लबचे उमेश पवार,कृषी पदवीधर संघाचे एच.के. पाटील,कारखान्याचे सचिव डी.एम.पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,कामगार संचालक मनोहर सन्मुख,विकास पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

राजारामनगर : राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मचाऱ्यांना रोपांचे वाटप करताना बी.डी.पवार, एच.के.पाटील, डी.एम. पाटील, प्रशांत पाटील, शिवाजी गोंदील, विकास पवार, महेश पाटील, संजय गुरव तसेच अधिकारी व कर्मचारी.
बी.डी.पवार म्हणाले,योगायोग असा आहे की,बापूंच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही कारखाना कार्यस्थळावर मोठया प्रमाणात वृक्षारोपण केले..आज हे वटवृक्ष आपणास सावली देत आहेत..सध्या आम्ही त्यांचे नातू प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना,बँक,दूध संघ,आरआयटी आदी राजारामबापू समूहातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना कडुलिंबाचे एक रोप देऊन ते वाढविणार आहोत. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे पर्यावरण संगोपन व संवर्धनासाठी दक्ष आहेत. त्यांच्या ग्रामविकास मंत्री काळातील इको व्हिलेज उपक्रमाने देशात नावलौकिक मिळविला आहे. आपण सर्वांनी काळाची गरज ओळखून हे रोप जीवापाड जपावे.
प्रारंभी सचिव डी.एम.पाटील हे स्वागत व प्रास्ताविक भाषणात म्हणाले,आमचे सर्व कर्मचारी या रोपांचे नक्की संगोपन करतील. आम्ही त्याचा वेळोवेळी आढावा घेऊ.
लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवाजी गोंदील, जनरल मॅनेंजर विजय मोरे, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, पदवीधर संघाचे मँनेजर बी.बी.कांबळे, धैर्यशिल पाटील, मुख्य वेळापाल संजय गुरव, सुरक्षा अधिकारी विरसेन गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








































































