Last Updated on 02 Apr 2023 8:16 AM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रा. शामराव पाटील : एनपीए शून्य टक्के राखण्यात यश
सांगली । लोकनेते राजारामबापू पाटील यांनी गेल्या ४२ वर्षांपूर्वी सामान्य माणसाला आर्थिक ताकद देण्यासाठी स्थापन केलेल्या आणि सध्या माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करणाऱ्या राजारामबापू सहकारी बँकेस २०२२-२३ या संपलेल्या आर्थिक वर्षात रुपये ४१ कोटी ९९ लाख इतका ढोबळ नफा झाला असून यावर्षीही बँकेने एनपीए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळविल्याची माहिती राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
राजारामबापू सहकारी बँकेने गेल्या २० वर्षापासून ३१ मार्चचा ताळेबंद १ एप्रिलला जाहीर करण्याची परंपरा निर्माण केलेली आहे. या परंपरेप्रमाणे प्रा.पाटील यांनी कालच संपलेली आर्थिक वर्षातील बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी बँकेचे जेष्ठ संचालक विजयराव यादव,संजय पाटील, माणिक पाटील,डॉ.प्रकाश पाटील,धनाजी पाटील,शिवाजी मगर,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव हुबाले,व्यवस्थापकीय संचालक सीए-प्रदीप बाबर,चीफ जनरल मॅनेंजर आर.ए.पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा.पाटील म्हणाले,आम्ही ढोबळ नफ्या तून संशयित व बुडीत निधीसाठी अतिरिक्त रुपये १८ कोटी ६४ लाख,तर आयकरसाठी रुपये ७ कोटी ७० लाखाची तरतूद केलेली आहे. या तरतुदी वजा जाता बँकेस १४ कोटी १६ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. २०१९ च्या २२ मार्चला आपल्या देशात लॉक डाऊन जाहीर झाला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात बँकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दिलेले कर्ज वसूल झाले नाही आणि नवीन कर्ज वाटप करता आले नाही. मात्र संपलेले सन २०२२-२३ हे वर्ष बँकांना चांगले गेलेले आहे.
संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी २ हजार २७० कोटी ७६ लाख झाल्या असून १ हजार ५२७ कोटी ८५ लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे. या वर्षात बँकेने रुपये ३ हजार ७९८ कोटींचा व्यवसाय केलेला आहे. या वर्षात रुपये १८० कोटीच्या ठेवी आणि रुपये ३११ कोटींचा व्यवसाय वाढलेला आहे. बँकेच्या ३९० सेवकांनी प्रति सेवक रुपये ९ कोटी ७४ लाखाचा व्यवसाय केलेला आहे.
स्व.बापूंनी १९८१ साली अतिशय छोट्या प्रमाणात बँक सुरू केली. सध्या माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने प्रगतीचा मोठा टप्पा पार केलेला आहे. सध्या संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असून ४५ शाखा आहेत. तासगाव व कराड येथे शाखा मागणी केलेली आहे. टीसीएस या जगातील दर्जेदार कंपनीने आपल्या सहकारी बँकेस अद्यावत संगणक प्रणाली दिली. सुरुवातीस काही अडचणी आल्या. मात्र सध्या अद्यावत व तत्पर सेवा दिली जात आहे. भविष्यात एटीएम बॉक्स हे पूर्वीच्या क्वाईन बॉक्स प्रमाणे बंद होतील. आपल्या बँकेत ७० टक्के व्यवहार हे ऑन लाईन चालतात. भविष्यात ते आणखी वाढणार आहे. देशातील राष्ट्रीय आणि व्यावसायिक बँकांच्यापेक्षा आपल्या बँकेचा व्याज दर कमी आहे. सध्या आर्थिक व्यवस्था स्थिर होत असल्याने बँकांना त्याचा लाभ होत आहे. भविष्यात अद्यावत तंत्रज्ञाना च्या माध्यमातून अधिक चांगल्या दर्जाची ग्राहक सेवा देण्यावर आमचा भर असेल. बँकेच्या यशात सर्व सभासद,खातेदार, संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे.
यावेळी संचालक सर्वश्री जयकर गावडे, जगन्नाथ स्वामी,अनिल गायकवाड,आनंदराव लकेसर,प्राचार्य दीपा देशपांडे,संभाजी पाटील,शहाजी गायकवाड,नामदेव मोहिते, व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील वैद्य, उमाकांत कापसे,डॉ.सचिन पाटील,आर.एस. जाखले,शिवाजी कुंभार यांच्यासह मुख्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.












































































