Last Updated on 04 Dec 2024 12:02 AM by Sanjay Patil/Adhorekhit
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते अनावरण
मुंबई । क्रिकेटमध्ये जसं सगळं बदलत गेलं, तसंच आमच्या राजकारणात देखील बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये अंपायरनी आऊट दिल्यावर तो थर्ड अंपायर असतो. मला वाटतं गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला देखील थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते. मात्र आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही देखील काही करू शकलो नाही. असा टोला लगावत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
क्रिकेट प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) इथं भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलत होते. रमाकांत आचरेकर यांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय, माजी क्रिकेटर प्रवीण आमरे आदी उपस्थित होते.
आज रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आलं आहे. स्मृती स्मारकात क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांची ओळख सांगणारी प्रतिकात्मक चिन्ह क्रिकेट स्टम्प्स, बॉल, बॅट आणि रमाकांत आचरेकर यांची ओळख सांगणारी विशेष टोपी आदी आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याविषयीचे अनुभव, दृष्टीकोन आणि आठवणी सांगून तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले. ‘दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी जगामध्ये जितके खेळाडू घडवले तितके कोणी घडवले नाही.
आम्हालाही थर्ड अम्पायर मिळाला असता तर…
गुरुपोर्णिमेला दरवर्षी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आजकालची गुरुपोर्णिमा हॅप्पी गुरुपोर्णिमा मेसेजवर थांबते. गुरु नावाची गोष्ट जपणे हे महत्वाचे असते. सुनली रमणी यांच्याशी मी बोललो. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावे असे मला वाटत होते. इथे मला पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. कॅप त्यांची ओळख होती. आज क्रिकेट बदललंय. साऱ्या गोष्टी बदलल्यात. पण त्यांनी खेळाडूंवर केलेले संस्कार त्यांच्या समोर बसलेल्या खेळाडुंमध्ये दिसतात. आजही विद्यार्थी सांगतात आम्हाला तेंडुलकर, कांबळीसारखं खेळता येत नाही. आचरेकर सर जिनियस होते. आचरेकर सरांच्या स्मारकाचं अनावरण करताना आनंद होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर महायुती वगळता सर्वच राजकीय पक्षांकडून निकालावर आक्षेप घेतले आहेत. यातच आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही निकालावरुन सत्ताधाऱ्यांना मनसे स्टाईल टोला लगावला आहे. क्रिकेट जगताशी तुलना करत राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. ‘क्रिकेटमध्ये जसं सगळं बदलत गेलं, तसंच आमच्या राजकारणात देखील बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये अंपायरने आऊट दिल्यावर तो थर्ड अंपायर असतो. मला वाटतं गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला देखील थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते.’ असे ठाकरे म्हणाले.












































































