Last Updated on 02 May 2023 2:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.“कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा.तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही.आता नवी जबाबदारी नको,असं म्हणत त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला.त्याचवेळी जयंत पाटील,धनंजय मुंडे,जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत.
‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतो अशी घोषणा केली.तसेच,पुढील अध्यक्षाचा निर्णय निवड समिती मार्फत करावी असेही शरद पवार यांनी सांगितले.मात्र शरद पवारांच्या या निवृत्तीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी,पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला.
कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे.जास्त मोह करणं योग्य नाही.मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवार यांनी जाहीर करताच यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं.’महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार..’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.एवढचं नव्हे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवार यांना स्टेजवर जाऊन विनवनी केली.अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी यावेळी विनवनी केली आणि त्यांना अश्रू अनावर झाले.यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे शरद पवार यांच्या पाया पडले आणि पक्षाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली.यामुळे सभागृहात भावुक वातावरण निर्माण झाले.
शरद पवार यांच्या या निर्णयानंतर नवा अध्यक्ष कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.विशेष म्हणजे यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही यावेळी शरद पवार यांनी केली.तसेच,अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असलो तरी,माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातील नाही. शिवाय,राज्यसभा सदस्यत्वाची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.
शरद पवारांच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार निवृत्तीची घोषणा मागे घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उपस्थितांची घोषणाबाजी
दरम्यान, शरद पवार यांच्या या घोषणेनंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पवार यांच्या घोषणेनंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा केली. कृपया हा निर्णय मागे घ्या, असे आर्जव केले.तर,राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पवार यांच्या पाया पडून निर्णय मागे घेण्याची विनंती केली.यावेळी शरद पवार,शरद पवार अशा जोरदार घोषणा झाल्या.
अखेर पवार म्हणाले…
निवृत्तीच्या घोषणेनंतर सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी सर्वांना शांत करत पवार म्हणाले की, काळजी करु नका. मी कुठेही असलो तरी सकाळ ते संध्याकाळ मी तुमच्यासाठी उपलब्ध असेन. आपण आपल्या अडी-अडचणी मांडू शकाल. जनतेचे प्रेम आणि विश्वास हेच माझ्यासाठी मोठे आहे. त्यापेक्षा अन्य काहीही नाही.
शरद पवारांची निवृत्तीची घोषणा, अजितदादांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की,साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात,महाराष्ट्रात फिरणारच आहेत.त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे.पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे.शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे.भावनिक होऊ नका.आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू असं आवाहन अजित पवार यांनी केले.
अन् जयंत पाटील यांना अश्रू अनावर

शरद पवार यांनी मी राजीनामा देत असलो तरी मी पक्षाचे कार्य करणार असल्याचे सांगितले.यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी सभागृहात रडत त्यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली.एवढेच नाही तर त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली.जयंत पाटील म्हणाले, आत्तापर्यंत महाराष्ट्रात आम्ही शरद पवार यांच्यामुळे आहोत. पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणं हे देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी आहे. त्यांनी असा निर्णय कुणालाही मान्य होणार नाही.कोणत्याही परिस्थितीत त्यांनी निर्णय मागे घ्यावा असे पाटील म्हणाले.
परोगामी चळवळीचे काय होणार…जितेंद्र आव्हाडही रडले
तर जितेंद्र आव्हाड हे देखील मनोगत व्यक्त करत असतांना ढसाढसा रडले.त्यांनी तुम्ही जर पक्ष सोडला तर आम्ही पोरके होऊ, देशात जे चालले आहे ते कसे थांबणार ? परोगामी चळवळीचे काय होणार असा सवाल करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले होते. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणा देण्यात आल्या. राजीनामा मागे घेण्यासाठी धनंजय मुंडे शरद पवारांच्या पाया पडले त्यांनी देखील राजीनामा मागे घेण्याची मागणी केली.












































































