Last Updated on 26 Sep 2022 8:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
![]()
मुंबई । राज्यात पोलीस विभागात २० हजार पदांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आम्ही पोलीस भरतीचा निर्णय घेतला असून दोन वर्षांची भरती प्रक्रिया लवकरच हातात घेत आहोत. पोलिसांची सुमारे 20 हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. 8 हजार पोलिसांच्या भरतीची एक जाहीरात यापूर्वी निघाली आहे,पुढे आणखी 12 हजार पोलिसांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध होईल. यामुळे पोलीस दलाला मोठा फायदा होईल.
मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
दरम्यान,मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्रधान सचिव (सुरक्षा) संजय सक्सेना, प्रधान सचिव (अपील आणि सुरक्षा) श्याम तागडे, अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कुलवंत कुमार सरंगल, अमितकुमार सिंग, अर्चना त्यागी, सह पोलीस आयुक्त, मुंबई विश्वास नांगरे-पाटील, राजवर्धन,राजकुमार व्हटकर यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यामध्ये सध्या सन 2019 मधील 5 हजार 297 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु आहे. सन 2020 मधील 7 हजार 231 पदांसाठी पोलीस महासंचालकांकडून भरती प्रक्रिया सुरु आहे. याबरोबरच सन 2021 अखेर रिक्त होणाऱ्या 10 हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या 12 हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. तसेच अन्य रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करा. मंत्रालय सुरक्षेबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
![]()














































































