Last Updated on 06 Nov 2024 10:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडी आणि महायुतीतली लढाई, संविधानाचे संरक्षक आणि संविधानाचे मारेकरी यांच्यातली लढाई आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात आज महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज देशातल्या प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवला आहे, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातले उद्योग आज गुजरात मध्ये जात आहेत, मुंबई अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा महायुतीच्या नेत्यांना डाव आहे, अशा सर्व आरोपांचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आज देशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचं ते म्हणाले. देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि संपत्तीचं समान वितरण होण्यासाठी जातीनिहाय जनगणना अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत महाराष्ट्रात सरकार आल्यावर या जनगणनेचं काम तत्काळ हाती घेतलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच केंद्रात सरकार आल्यावर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.
महायुती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र अधोगतीला गेला, भ्रष्टाचार प्रचंड वाढला, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केला. राज्यात परिवर्तनाचं वारं वाहत आहे, असं सांगत लोकसभेप्रमाणेच जनता आम्हाला कौल देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी , भाजपा आणि शिंदे यांच्यावर टीका केली. आमचं सरकार आल्यावर धारावी पुनर्विकासाचा अदानी यांच्याशी केलेला करार रद्द केला जाईल आणि धारावीतल्या लोकांना रोजगार देऊन तिथेच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. राज्यातल्या सर्व मुलांनाही मोफत शिक्षण दिलं जाईल, असं ठाकरे म्हणाले.
या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाविकास आघाडीचे राज्यातले सर्व नेते उपस्थित होते. या सभेत महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीनं ५ गॅरंटी जाहीर केल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये तर शेतकऱ्यांना ३ लाखांच्या कर्जमाफीची हमी यातून देण्यात आली आहे त्याचप्रमाणे महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास, शेतकऱ्यांना नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचं प्रोत्साहन, जातनिहाय जनगणना करणार त्याचप्रमाणे ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी देखील महाविकास आघाडीनं दिली आहे. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा वआणि मोफत ओषधे.आणि बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत भत्ता, ही आश्वासनं देखील महाविकास आघाडीनं दिली आहेत.












































































