Last Updated on 16 Feb 2022 7:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री ना.जयंत पाटील हे नेहमीच नागरिकांच्या संपर्कात असतात. समस्या मांडण्यासाठी नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असते. वयाने लहान असो व मोठा त्यांच्याशी गप्पा मारत ते विषय समजावून घेतात.आपला प्रश्न निश्चितच मार्गी लागणार अशी भावना भेटणाऱ्या प्रत्येकाची असते. बुधवारी (१६ फेब्रुवारी) जयंत पाटील साहेबांचा वाढदिवस त्या निमित्ताने…
राज्यातील विविध ठिकाणी दौरा असताना तरुण मुले,लहान मुलांना जयंत पाटील यांची भुरळ पाडते. आपला वाटणारा नेता म्हणून सर्वजण सहज साहेबांच्याकडे आकर्षित होतात ते घोळक्याने.! यात लहान मुलांची कमी नसते. निरागस मुलांना बोलते करणे. त्यांना नाव विचारात कौटुंबिक माहिती घेणे. त्यांच्या सोबत सेल्फी काढणे आदी गोष्टी त्यांना राज्यातील सर्वात व्यस्त मंत्रिपद असताना सहज जमतात.याचे अनेकांना कौतुक असते.मुलांचे यश त्याला प्रोत्साहन देताना ते स्वतःच्या फेसबुक व ट्विटर, इन्स्टाग्रामवर अशा गोष्टी,क्षण, काही छायाचित्रे शेअर करीत असतात.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्याचा जनसंपर्कला मोठा आहे. तेव्हा ते नागरिकांशी संवाद साधताना थेट संपर्क ठेवण्यास प्राधान्य देतात. लोकनेते राजारामबापू यांचे चिरंजीव म्हणून राज्यात बापूंचे सहकारी भेटतात. तेव्हा ते आदराने नतमस्तक होतात. आत्मियतेने विचारपूस करतानाच युवा पिढीला प्रोत्साहन देतात.

त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन तरुणाईमध्ये त्यांच्याबद्दल नेहमीच आकर्षण राहते. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गर्दीतही युवा पिढी त्यांच्याशी हस्तांदोलन करणे,संवाद साधणे, फोटो काढण्यासाठी धडपडताना दिसते. अनेक शालेय मुलामुलींनी ना.पाटील यांना विविध भेटीप्रसंगी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. भेट झालेल्या मुलांच्या यशाविषयी आपुलकीने चौकशी करून मार्गदर्शन करताना दिसतात.
अनेक विद्यार्थी-विद्याथीर्नीनी त्यांची व्यक्तीरेखा रेखाटतात. साहेबांच्या छबी चित्रातून साकारतात. त्या त्यांना भेट देण्यासाठी धडपडत करतात. तेव्हा शिक्षणाची विचारपूस करतानाच पाटील यांनी त्याचे कौतुक करतात. चित्रकलेतील आवड पाहून त्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या सल्ला देतात. काही दिवसापुर्वी मुंबई येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्याला एक लहान चिमुरडी आपल्या वडीलांसह आली होती. कार्यकर्त्यांची नेत्यांची प्रचंड गर्दी होती. पण तिला त्या गर्दीत पाहून ना.पाटील यांना कौतुक वाटले. त्यांनी तिला जवळ घेत तिच्या बरोबर फोटो काढला व तिचे डोळे अत्यंत उत्सुक होते, अशा अशयाची पोस्ट त्यांनी केली होती.
वाळवा तालुक्यातील भडकंबे येथे कार्यक्रम सुरू असताना सहा वर्षीय संचित गावडेही तिथे उपस्थित होता . आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून संचितलाही याचं कुतूहल वाटलं. मोठी हिंमत करुन संचितने जयंत पाटील यांच्याकडे नारळ फोडण्याची इच्छा व्यक्त केली .यानंतर जयंत पाटील यांनीही त्याला नारळ फोडून देत इच्छा पूर्ण केली.
” मला तुमचा फोटो काढायचाय” असं एका लहानग्याचं वाक्य कानी पडताच मंत्री जयंत पाटील यांनी त्या लहानग्याला तात्काळ पोझ दिली आणि ‘नीट काढलास ना रे फोटो’ असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली होती.जेव्हा मंत्री आणि त्यांचा ताफा गावागावात फिरत असतो त्यावेळी लहानग्यांचा तो कुतुहलाचा विषय असतो . त्या कुतुहलातूनच लहानग्याने मंत्री जयंत पाटील यांचा काढलेला एक कौतुकाचा विषय ठरला होता. ६ वर्षाचा रुद्र जंगम या ६ लहानग्याने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि जयंत पाटील यांनी लगेचच लहानग्याचा हट्ट पुरवला .

अहमदनगर जिल्हयातील तिसरीत शिकणाऱ्या एका विद्याथीर्नींचे हस्ताक्षर सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. तिचे सुंदर हस्ताक्षर पाहून ना.पाटील यांनी आजच्या धावपळीच्या युगात हाताने लिहिणे दुर्मिळ होत चालले आहे. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप व तिच्या भावी शैक्षणिक कारकिदीर्ला शुभेच्छा दिल्याचे पत्र ना.पाटील यांनी पाठवले होते.लॉकडाउनच्या काळात इस्लामपूर येथील शालेय विद्यार्थीनी सई विनोद मोहिते हिने वाढदिवसाचा खर्च टाळत , त्याऐवजी ४०० जणांना मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली होती. तेव्हा सामाजिक भान जपत मदतीला धावून आलेल्या सईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
कठीण परस्थितीवर मात करत यांनी यश संपादन केलेल्या अनेक मुलांचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करतात.सतत नाविन्याचा ध्यास बाळगणारे ना.पाटील हे नव्या युवा पिढीला प्रोत्साहीत करीत आहेत.
इस्लामपुरातील अकरा वर्षाची रिया मोहिते नावाची चिमुरडी ना.पाटील यांची खास मैत्रिण आहे. ती दोन वर्षाची असल्यापासून पालकांच्या मदतीने साहेबांशी संपर्क साधून असायची. एकदा थेट मंत्री पाटील यांनी तिच्या घरी जावून भेट घेतली होती. तिच्याशी असणारी मैत्री वाढवत दरवर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त ते स्वतः वाढदिवस साजरा करतात.
लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते सतत सूचना करतात. कोणत्याही आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे. त्यांना मुलांच्या आरोग्यासाठी दक्ष राहण्यासाठी मार्गदर्शन करतात. स्वतः पालकांच्या संपर्कात राहून ते आधार देतात. आर्थिक अडचणी असतील तर त्या कशा दूर करतात येतील याकडे त्याचा कटाक्ष असतो.मुलांनी शिकले पाहिजे. ही भूमिका स्व.राजारामबापू पाटील यांची होती. यासाठी त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जयंत पाटील चालत आहेत. त्यांचीही भूमिका मुलांनी उच्च शिक्षणा घ्यावे, क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे हीच असते. व उच्च शिक्षण घेणा-या प्रशासनात मोठया पदावर निवड झालेल्या मुलांचे ते नेहमी कौतुक करत असतात.
लहानपणी पासून मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी साहेब आग्रही भूमिका घेताना दिसतात. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. भावी पिढी घडवण्यासाठी शाळा सक्षम असल्या पाहिजेत हा आग्रह धरत मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. ही नेत्याची दूरदृष्टी निश्चित देशाला चांगले नागरिक देईल. यात जयंत पाटील साहेबांचा वाटा मोठा असेल हे निश्चितच..साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
विनोद मोहिते
इस्लामपूर








































































