Last Updated on 23 Aug 2024 6:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कोलकता,बदलापूर आणि इतर ठिकाणच्या महिला आणि मुलींच्यावरील झालेल्या पाशवी अत्याचाराने व्यथित झालेल्या शहरातील नागरिकांनी इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर चौकात शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धरणे आंदोलनास सुरुवात झाली. निषेधाच्या घोषणा नाहीत, कुणाची भाषणे नाहीत, कुणाला निवेदन देणे नाही फक्त लोकांनी शांत बसून सनदशीर मार्गाने घटनेचा निषेध नोंदवला.महा. अं. नि. स.चे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी पुढाकार घेतला होता.
कोलकत्ता बदलापूर आणि अन्य काही ठिकाणी महिला व मुलींवर झालेल्या पाशवी अत्याचाराने व्यतीत झाल्याची सार्वत्रिक भावना होती. या चिंताजनक परिस्थिती बाबत प्रचंड संतापाची भावना अनेकांच्या मनात होती आणि मोठ्या वेदनाही होत्या. या घटनेने कोणाही संवेदनशील आणि जबाबदार माणसाच्या मनात या संतापाच्या भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. या घटनांना जबाबदार असणाऱ्या विकृत मनोवृत्तीचा निषेध करणे, अशांना विकृत गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन होणे ,या मागणीसाठी शांततामय मार्गाने आणि विवेकशील पद्धतीनेनिषेध नोंदू या . असे आवाहन समाज माध्यमात करण्यात आले होते. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोणतीही संघटना नाही ,राजकीय पक्ष म्हणून सहभाग न घेता , घोषणा फलक भाषण न करता, कुणालाही निवेदन न देता या ठिकाणी हे आंदोलन पार पाडले.
कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.आर.डी.सावंत, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील (अण्णा), रोझा किणीकर,प्रा. एल. डी. पाटील, डॉ.विजयकुमार वडेर ,कालिदास पाटील, रणजित चव्हाण,शहाजी पाटील, धनाजी गुरव,नितीन फल्ले,प्रा.क्रांती कांबळे,डॉ जी. के.किर्दत, भाग्यशाली खरात, मधुकर घोलप, यशवंत धुमाळे, प्रा.बी.आर.जाधव,शकील सय्यद,श्रीनिवास आठवले,प्रा.अशोक जाधव,शरद कुंभार,प्रशांत इंगळे,अजय भालकर, एम.डी.जाधव यांनी सहभाग घेतला.












































































