Last Updated on 29 Feb 2024 8:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । प्रत्येक व्यक्ती जेव्हा ती आपल्या मातृभाषेला मोठी करते तेव्हा ती स्वतःलाही मोठी करत असते.परिश्रमाशिवाय स्वतःला सिद्ध करता येत नाही असे मत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेते कुणाल मेश्राम यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, परळ, मुंबई येथे ‘मराठी भाषा आणि वांड.मय मंडळ’ आयोजित ‘मराठी गौरव दिना’ निमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिलीपकुमार कांबळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने झाली.प्राध्यापकांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगत विविधांगी प्रादेशिक कविता सादर केल्या. तर विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे संकलन करून भीत्तीपत्रक तयार केले.कुणाल मेश्राम यांनी विद्यार्थीमध्ये आपल्या अनोख्या शैलीत वऱ्हाडी बोलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.अनेक किस्से आणि अनुभव ऐकविले. चारोळ्या सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी होऊन गेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिलीपकुमार यांनी वास्तवतेचे भान असणारी ‘दि रिमेक ऑफ रामायणा’ही कविता सादर केली व दैनंदिन जीवनात मराठी भाषा जाणीवपूर्वक बोलल्यानेच तिचे संवर्धन होणार आहे असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन प्रा. आभा चिमण यांनी केले.तर प्रा. मिलिंद ठोके यांनी आभार मानले.












































































