Last Updated on 26 Jan 2022 2:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन राज्यभरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

राज्याने आरोग्य, पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, पर्यटन, वने, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा अशा विविध क्षेत्रात गेल्या अडीच वर्षात भरीव कामगिरी केली आहे. राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान असून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करूया, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारकांना अभिवादन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, तिन्ही सेनादलाचे राज्यातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव दीपक कपूर, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदन, कोविड योद्धे आदी उपस्थित होते. कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राजभवन येथे ध्वजारोहण
तत्पूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकवला व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राष्ट्रगीत म्हटले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे, मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते व विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी विधानपरिषदेच्या माजी सदस्य श्रीमती विद्या चव्हाण तसेच विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत, सह सचिव तथा विशेष कार्य अधिकारी डॉ.अनिल महाजन, उप सचिव श्री. शिवदर्शन साठये, श्री.राजेश तारवी, सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव श्री.रविंद्र जगदाळे, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे | भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विधानसभा सदस्य झीशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरण करण्यासाठी कार्य केल्याबद्दल स्वयंरोजगारीता उत्कृष्ट कर्मचारी या संवर्गातून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल निकिता वसंत राऊत यांचा पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नेहा नलीन पावसकर यांना दिव्यांग व्यक्तीचे सबलीकरण करण्यासाठी कार्य केल्याबद्दल आदर्श व्यक्ती या संवर्गातून राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याण निधी अंतर्गत कमांडर संदीप कुमार यांची पाल्या दिव्या, नायक महेश गणपत मोहिते यांची पाल्या दिव्या, नायक महेश नंदकुमार अर्जुन पवार यांची पाल्या मानसी, हवालदार सुनिल एकनाथ इंदुलकर यांची पाल्या सिद्धी, हवालदार देविदास राजाराम पवार यांची पाल्या क्षितीजा यांना पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते 10 हजार रुपयांचे धनादेश आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले.
जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यामार्फत जय सचिन खंडेलवाल यांना (तलवारबाजी) गुणवंत पुरस्कार पुरुष खेळाडू, ऋचा दरेकर (तलवारबाजी) गुणवंत महिला खेळाडू, मानसी गिरीशचन्द्र जोशी यांना (पॅरा बॅडमिंटन) गुणवंत दिव्यांग खेळाडू, केदार रामचंद्र ढवळे (तलवारबाजी) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, प्रीती रमेश एखंडे (एक्रोबँटिक्स जिम्नॅस्टिक) गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार या सैनिकांच्या पाल्यांना श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व धनादेश देण्यात आले.
पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच उपस्थितांची भेट घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहासिनी गावडे यांनी केले.
नांदेड येथे पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर सकाळी 9:15 वाजता राज्याचे बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, आमदार, प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर पालकमंत्री अशोक चव्हाण याच्या हस्ते ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.तर जिल्हाभरात पालकमंत्री या नात्याने कोविड काळात विविध आरोग्य सुविधा, अँबुलेन्स, ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, त्याच प्रमाणे जिल्हाभरातील रस्ते,पाणीपुरवठा, सिंचनाचे छोटे मोठे प्रकल्प उभे करून सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्याची प्रगतीकडे वाटचाल – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली | दोन वर्षाच्या कालावधीत राज्यासमोरील प्रत्येक आव्हानावर मात करण्याचा, जनतेच्या आशा-आकांक्षा, अपेक्षांवर खरे उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा शासनाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये यशही मिळाले आहे. महाविकास आघाडीचे शासन शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे आणि पुढच्या काळातही करीत राहू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व जिल्हा वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, खासदार गिरीष बापट, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर आदि मान्यवर उपस्थित होते.
सर्वांगीण विकासाबरोबरच आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून 400 कोटी नुकतेच मंजुर करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या पेक्षा अधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता जम्बो कोविड हॉस्पिटलसह आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर बी.टी आलदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र सैनिक व शहिद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.








































































